क्रांती गोडबोले-पाटील
भारतीय संगीताच्या अथांग आकाशात ज्या स्वरांनी आपल्या अस्तित्वाचा इंद्रधनुष्य सात दशकांहून अधिक काळ लख्ख तेवत ठेवला, त्या स्वरांचे नाव म्हणजे आशा भोसले. आशाताईंचे जीवन म्हणजे केवळ एक यशस्वी कारकीर्द नाही, तर तो एक अदम्य जिद्दीचा, अपार कष्टांचा आणि अष्टपैलू प्रतिभेचा एक महाप्रवास आहे. हा प्रवास एका अशा प्रवाहासारखा आहे जो खडकाळ वाटांवरून आदळत-आपटत निघाला, पण त्याने आपले चैतन्य आणि प्रवाहीपण कधीच गमावले नाही. त्यांच्या आयुष्यातील आठवणींचे पदर उलगडणे म्हणजे संगीताच्या एका देदीप्यमान कालखंडाला पुन्हा एकदा जगण्यासारखे आहे. आशाताईंच्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात काही फुलांच्या पायघड्यांवरून झालेली नव्हती. उलट, चित्रपटसृष्टीच्या त्या झगमगत्या दुनियेत त्यांना अक्षरशः ‘धक्का’ देऊन उतरवण्यात आले होते. ज्या काळात गीता दत्त, शमशाद बेगम, अमीर भाई कर्नाटकी आणि जोहराबाई अंबालेवाली यांसारख्या पहाडी आवाजाच्या गायिकांचा हिंदी चित्रपटसृष्टीत दरारा होता, त्या काळात एका कोवळ्या मराठी मुलीने आपले पाय रोवणे ही साधी गोष्ट नव्हती. त्यातही त्यांची थोरली बहीण, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नावाचा लख्ख सूर्य तेव्हा आभाळात तळपत होता. अशा वेळी ‘आपल्याला आपली वेगळी जागा निर्माण करायची आहे, आपली स्वतःची शैली घडवायची आहे,’ हा ध्यास घेऊन आशाताईंनी या क्षेत्रात उडी घेतली.
सुरुवातीच्या काळात त्यांना अनेकदा हिणवले गेले. ‘ह्या मराठी मुलींना उर्दू काय जमणार?’ अशा टोमण्यांना त्यांनी उत्तर दिले ते कष्टाने. त्यांनी जिद्दीने उर्दू भाषा शिकली, भाषेचे व्याकरण आणि उच्चारशास्त्राचे बारकावे आत्मसात केले. पण गाणे म्हणजे केवळ उच्चार नव्हे, तर तो एक ‘लहेजा’ असतो, हे त्यांनी त्यांच्या सजग कानांनी शिकले. ‘कान उघडे ठेवले की माणूस खूप काही शिकतो,’ असे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. भाषेचा हा लहेजा आणि त्यातील भाव त्यांच्या गळ्यात अशा काही सहजतेने उतरले की, पुढे याच भाषेतील गझला आणि ठुमऱ्या त्यांच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनल्या. आशाताईंच्या आठवणींच्या साठ्यात संगीतकार सुधीर फडके म्हणजेच लाडक्या ‘बाबूजीं’चे स्थान अत्यंत वरचे आहे. बाबूजींकडून त्यांनी शब्दांची प्रतिष्ठा शिकली. बाबूजी म्हणायचे की, ‘मी दगडाची मूर्ती घडवायला गेलो, पण छिन्नी लावायच्या आधीच ती मूर्ती स्वतःच घडत होती.’ ही दाद एका महान गायिकेसाठी केवढी मोठी पावती होती! बाबूजींच्या ‘सावळ्याची जणू सावली’सारख्या रचना असोत किंवा ‘ऋतू हिरवा’सारखी अलवार गाणी, या गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी आशाताईंनी केलेली मेहनत शब्दातीत आहे. श्रीधर फडके जेव्हा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संगीत देऊ लागले, तेव्हा त्यांच्या ‘किरकिरी’बद्दल (संगीतविषयक बारकावे) तक्रार करतानाही आशाताईंच्या डोळ्यांत एक कौतुक असायचे. आशाताईंच्या आयुष्यात कर्तव्याचा आणि कष्टाचा परिपाठ खूप मोठा आहे. त्यांच्या आठवणींमधला एक अत्यंत भावनिक भाग म्हणजे त्यांचे कौटुंबिक आयुष्य. एकीकडे दिवसाला सात-सात गाणी रेकॉर्ड करण्याचा जागतिक विक्रम आणि दुसरीकडे एक सामान्य गृहिणी म्हणून पार पाडलेली जबाबदारी, हा मेळ त्यांनी कसा घातला असेल याचे आजही आश्चर्य वाटते. पहाटे सात वाजता घराबाहेर पडताना मुलांचा डबा तयार असणे, त्यांना शाळेत सोडणे आणि त्यानंतर स्टुडिओमध्ये जाऊन तासनतास रेकॉर्डिंग करणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. त्या काळातील संगीत दिग्दर्शकही त्यांच्यातील या विलक्षण मातृत्वाचा आदर करायचे. गाण्याच्या मधल्या वेळात तासाभराची सुटी मागून घरी जाऊन मुलांचा अभ्यास आणि जेवण बघून पुन्हा कामावर परतणाऱ्या आशाताईंनी कधीही कलेसाठी कर्तव्याकडे पाठ फिरवली नाही. स्वयंपाक हा त्यांच्यासाठी केवळ रोजचा उदरनिर्वाह नव्हता, तर ती एक अभिजात कला होती. संगीतातील हरकतींसारखीच त्यांच्या हाताची चवही न्यारी आहे. शांता शेळके आणि सुरेश भट यांसारख्या दिग्गजांनी त्यांच्या हातच्या जेवणाचे कौतुक केले होते. मजरुह सुलतानपुरी यांच्या बेगमकडून त्यांनी कबाब आणि बिर्याणीचे बारकावे शिकले आणि ते आपल्या डायरीत लिहून ठेवले. हीच जिद्द पुढे ‘आशाज्’ या आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट साखळीच्या रूपाने जगासमोर आली. कलेच्या क्षेत्रात असूनही मातीशी असलेले हे नाते त्यांनी कधीच तुटू दिले नाही. माणसे आणि साधेपणा याबद्दल बोलताना आशाताईंचे विचार अत्यंत स्पष्ट होते. राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रांतही आशाताईंचा वावर तितकाच सहज होता. पण त्यांना राजकारण हे ‘राजकारण’ म्हणून कधीच आवडले नाही, तर त्यांना आवडली ती माणसे. मग त्यामध्ये स्पष्टवक्ते राज ठाकरे असोत, प्रेमळ शर्मिला ठाकरे असोत किंवा ज्यांच्या साड्या आणि कुंकवाचे आशाताईंना नेहमीच आकर्षण वाटले अशा दिवंगत सुषमा स्वराज असोत. माणसांना माणूस म्हणून भेटणे आणि त्यांच्यातील चांगुलपणा टिपणे ही आशाताईंची सवय त्यांच्या गाण्यातल्या संवेदनशीलतेला अधिक गडद करते. आजच्या काळातील तांत्रिक क्रांतीबद्दल बोलताना आशाताईंच्या स्वरात थोडी खंत असायची.
एकेकाळी एका माइकवर, सर्व वादकांसोबत लाइव्ह रेकॉर्डिंग करण्याचे जे थरार आणि समाधान होते, ते आजच्या डिजिटल युगात हरवले आहे असे त्यांना वाटते. ‘आजकालची गाणी ‘मॅकेनिक’ झाली आहेत, एका ओळीचे रेकॉर्डिंग करून गाणे तयार होते, पण त्यातील भावना हरवतात,’ असे त्यांचे स्पष्ट मत होते. गाणे हे केवळ गळ्यातून नाही तर ते हृदयापासून यायला हवे ते त्यांनी आयुष्यभर जपले. भांड्यांची आणि साड्यांची असलेली हौस कायम एखाद्या तरुण मुलीसारखीच ताजी होती. नाशिकचा कासार बाजार असो वा घराघरात असणारी जुनी पितळी भांडी या गोष्टी कायमच त्यांच्या जगण्यात आनंद निर्माण करायच्या. त्यांच्या घरी कळशा, हंडे आणि लंगड्या यांसारखी जुनी भांडी आजही जपून ठेवलेली आहेत, जी त्यांच्या परंपरांशी असलेल्या नात्याची साक्ष देतात. संगीताच्या प्रवासात हृदयनाथ मंगेशकरांच्या चालींबद्दल बोलताना त्या म्हणायच्या की, त्यांची गाणी गाणे म्हणजे स्वरसाधनेचे एक कठीण दिव्यच असे. ‘जीवलगा’सारखे सात मिनिटांचे गाणे एका टेकमध्ये गाताना होणारी मानसिक आणि शारीरिक कसरत आणि दीदीसोबतच्या त्या ‘गोड’ भीतीदायक आठवणी सांगताना त्या पुन्हा लहान व्हायचा. ‘रेशमाच्या रेघांनी’सारखी ठसकेबाज लावणी असो किंवा मदन मोहन यांची गझल, प्रत्येक गाण्यामागे त्या त्या नायिकेचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर ठेवून त्या स्वर लावत असत. हेलनच्या नृत्यासाठी लागणारा तो विशिष्ट हेलकावा असो वा पद्मिनी कोल्हापुरेसाठी लागणारा तो अल्लडपणा, आशाताईंनी आपल्या आवाजातून अनेक अभिनेत्रींचे आयुष्य पडद्यावर जिवंत केले. एखाद्या नायिकेने गाण्यात नक्की कसा अभिनय केला असेल, तिच्या डोळ्यांच्या हालचाली कशा असतील, याचा विचार करून त्या आपला आवाज बदलत असत, हे त्यांच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाचे जिवंत उदाहरण आहे. वयाची पंच्याऐंशी वर्षे ओलांडल्यानंतरही आशाताईंचा उत्साह आजही तरुणांना लाजवणारा होता. पण या लखलखत्या प्रवासाच्या मागे त्यांनी पाहिलेली दुःखेही अफाट होती. तरुण मुलीचे आकस्मिक जाणे, या आघाताने कोणत्याही माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. ‘देवाने मला खूप दिले, पण तितकेच क्रूर आघातही केले,’ हे सांगताना त्यांच्या स्वरात एक अगतिकता जाणवते. मात्र, त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडे त्यांच्यासाठी आधारवड बनले. मुलाने दिलेल्या शब्दांमुळेच त्या आजपर्यंत त्यांनी स्वतःला म्हातारे मानले नाही. ‘तू जर वाकलीस किंवा स्वतःला म्हातारी म्हणालीस, तर मी घर सोडून जाईन,’ या मुलाच्या प्रेमाच्या धमकीनेच त्यांना आजही ताठ मानेने उभं राहण्याची प्रेरणा दिली. लेखन आणि आत्मचरित्राबद्दल बोलताना त्या म्हणतात की, आजही मनात अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत, ज्या कदाचित शब्दांत मांडणे कठीण आहे. पण ही जीवनरूपी नदी आता समुद्राला मिळायला निघाली आहे. जेव्हा त्या विचार करतात की, ही सगळी भांडी, हे दागिने आणि ही सुखाची खुर्ची कायमची कुणाचीच नसते, तेव्हा त्यांच्यातील तत्त्वज्ञ जागा होतो. पण तरीही, ‘पुढच्या जन्मी आपल्याला आशा भोसलेच व्हायचे आहे,’ ही त्यांची जिद्द चकित करणारी ठरते. अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करणे आणि भारतीय संगीत सातासमुद्रापार अजून जोमाने नेणे, हे त्यांचे स्वप्न आजही धगधगते आहे. आशाताईंचे हे अनुभव म्हणजे केवळ आठवणी नाहीत, तर जीवनाचा तोल कसा सांभाळावा, याचा एक वस्तुपाठ आहे. स्वरांच्या या राणीने जीवनातील प्रत्येक कडवट घोट पचवून जगाला मात्र सुरांचे मधुर अमृतच दिले आहे. रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाच्या जोरावर आजही त्या तितक्याच ठसकेबाजपणे आणि आत्मविश्वासाने गाऊ शकतात, हेच त्यांच्या जीवनाचे सर्वात मोठे यश आहे. शेवटी, आशाताईंच्या आयुष्याकडे पाहताना सुरेश भटांच्या त्या ओळी आठवतात ज्या त्यांनी आशाताईंसाठीच लिहिल्या होत्या - ‘तलवार तुझ्या गीतांची बिजलीसम तळपत राहो.’ खरोखरच, आशाताईंचे गाणे ही एक तळपती वीज आहे, जी अंधाराला छेदून प्रकाश निर्माण करण्याची ताकद ठेवते. या स्वरदेवतेचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही, फक्त त्यांच्या स्वरांच्या सहवासात स्वतःला समृद्ध करत राहणे हेच आपल्या हातात आहे. या अष्टपैलू गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली.
(सौजन्य : यूट्यूबवर सुधीर गाडगीळ यांनी पार्ले येथे चार वर्षांपूर्वी आशा भोसले यांच्या घेतलेल्या मुलाखतीवरील शब्दबद्ध लेख)