अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज पहाटे त्याच्या राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केला व त्यामध्ये सैफ गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला मध्यरात्री त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात चोरीच्या उद्देशातूनच हा हल्ला करण्यात आल्याचे दिसत आहे. एका आरोपीची ओळख पटली असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांची 10 पथके काम करत आहेत, अशी माहिती पोलीस झोन 9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. यासोबतच सैफ अली खानच्या घरात आरोपी हल्लेखोर कसा शिरला यासंदर्भातही गेडाम यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
असा शिरला हल्लेखोर सैफच्या घरात
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुंबई पोलीस या घटनेचा वेगाने तपास करत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी सैफचे घर आणि परिसराचा अतिशय बारकाईने तपास केला. सैफच्या घरात शिरलेल्या आरोपींपैकी एकाची ओळख पटली आहे. सैफच्या घरात शिरण्यासाठी आरोपीने आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या मार्गाचा अर्थात आग लागल्यावर बाहेर पडण्यासाठी असलेल्या जिन्याचा वापर केला, अशी माहिती आतापर्यंतच्या पोलिस तपासात समोर आली असल्याचे गेडाम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
सैफला टार्गेट करून हल्ला झाला का?
दरम्यान, सैफवरील हल्ल्लाचा अनेक सेलिब्रेटी तसेच राजकारण्यांकडून निषेध करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या एक्स पोस्ट नंतर सैफवरील हल्ला हा नियोजित कट आहे का? तसेच टार्गेट करून हा हल्ला झाला का? हा प्रश्न अनेक स्तरांमधून विचारला जात आहे. गेडाम यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, प्राथमिक तपासात चोरीचाच उद्देश असल्याचा निष्कर्ष निघत आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची १० पथके कार्यरत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल. अटकेनंतरच पुढील माहिती देण्यात येईल, असेही गेडाम यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले. तसेच अज्ञात हल्लेखोरावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया यशस्वी; ICU मध्ये शिफ्ट
"सैफ अली खानला पहाटे २ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पाठीच्या कण्याला मोठी दुखापत झाली होती. मणक्यात चाकूचे टोक अडकल्याने चाकू काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला झालेल्या जखमा आणि त्याच्या मानेवर झालेल्या जखमा प्लॅस्टिक सर्जरी टीमने दुरुस्त केल्या असून तो आता बरा झाला आहे आणि प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे'', असे लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.
सैफ अली खान याला सध्या ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.