बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. मंगळवारी (दि. ११) रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील जुहू येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, गोविंदा घरी असतानाच अचानक बेशुद्ध पडले आणि त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून ते सध्या देखरेखीखाली आहेत. तसेच, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
गोविंदाचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी सांगितलं की, “गोविंदाजींना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि ते बेशुद्ध झाले. आधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषध देण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांच्या काही महत्त्वाच्या तपासण्या केल्या असून बेशुद्ध पडण्यामागचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.”