मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय गुप्ता यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी (दि. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, कोणताही घातपात किंवा संशयास्पद बाब आढळली नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
बाथरूममध्ये पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी संजय गुप्ता यांच्या घरातील सर्वजण झोपले होते. त्यामुळे रात्री घडलेल्या या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना तत्काळ मिळाली नाही. शनिवारी (दि. ३१) सकाळी ही घटना त्यांच्या निदर्शनास आली.
पोलिसांनी दिली घटनेची माहिती
उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. संजय गुप्ता हे पत्नी, दोन मुले आणि घरातील एका मदतनीसासोबत बंगल्यात राहत होते. घटनेच्या वेळी कुटुंबातील सर्वजण झोपलेले होते. सकाळी त्यांना या घटनेची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त केलेला नाही किंवा पोलिसांत तक्रारही दाखल केलेली नाही, असे उपायुक्तांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संजय गुप्ता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, वर्सोवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
अशोक पंडित यांनी व्यक्त केला शोक
संजय गुप्ता यांच्या निधनाच्या वृत्ताला चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही दुजोरा दिला आहे. त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत गुप्ता यांच्या आठवणींना उजाळा दिला. संजय गुप्ता यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगत त्यांनी चित्रपटसृष्टीने एक गुणी दिग्दर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली.
अशोक पंडित यांच्या मते, संजय गुप्ता हे केवळ उत्तम दिग्दर्शक नव्हते, तर त्यांच्याकडे कथा सांगण्याची विशेष हातोटी होती. उत्साही स्वभाव आणि चित्रपटांबद्दलची आवड यामुळे ते अनेकांच्या जवळचे होते. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याचेही पंडित यांनी म्हटले आहे.
काही वर्षांपूर्वी भीषण अपघातातून बचावले होते
संजय गुप्ता यांच्याबाबत आणखी एक महत्त्वाची आठवण म्हणजे काही वर्षांपूर्वी पुणे-मुंबई प्रवासादरम्यान त्यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. मात्र, उपचारानंतर त्यांनी प्रकृतीवर मात करत पुन्हा कामाला सुरुवात केली होती. त्या अपघातातून ते सुखरूप बाहेर पडले होते. आता त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
'आतिश' चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण
संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आतिश : फील द फायर' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य पांचोली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अॅक्शन दृश्ये, दमदार संवाद आणि वेगळ्या पद्धतीने कथा मांडण्याची त्यांची शैली या चित्रपटातून समोर आली. पुढे त्यांनी गुन्हेगारी विश्व आणि मुंबईतील अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले.
'कांटे' चित्रपटाने मिळवून दिली विशेष ओळख
संजय गुप्ता यांच्या कारकिर्दीतील 'कांटे' हा चित्रपट विशेष लोकप्रिय ठरला. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या थरारपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, लकी अली आणि कुमार गौरव यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दरोड्याच्या कथानकावर आधारित या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण अमेरिकेत करण्यात आले होते. वेगळे कथानक, दमदार कलाकार आणि गुन्हेगारी विश्वाचे चित्रण यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
'शूटआऊट' मालिकेसह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन
संजय गुप्ता यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट केले. 'मुसाफिर' (२००४) या चित्रपटाच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 'शूटआऊट ॲट लोखंडवाला' (२००७) या चित्रपटाचे निर्माते म्हणून काम पाहिले. तर 'शूटआऊट ॲट वडाळा' (२०१३) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मुंबईतील अंडरवर्ल्ड, टोळीयुद्ध आणि गुन्हेगारी विश्वाचे चित्रण हे त्यांच्या चित्रपटांचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले.
याशिवाय, हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या 'काबिल' (२०१७) या चित्रपटाचेही त्यांनी दिग्दर्शन केले. या चित्रपटात अॅक्शनसोबतच सूडनाट्याची कथा पाहायला मिळाली. त्यानंतर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुंबई सागा' या अॅक्शनपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
कमाल खान यांचीही भावूक पोस्ट
संजय गुप्ता यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर कमाल खान यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या पोस्टमध्ये त्यांनी संजय गुप्ता यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
'भावपूर्ण श्रद्धांजली, संजय भाई. तू आपल्यातून निघून गेलास, यावर माझा विश्वासच बसत नाही. चित्रपट आणि बॉलिवूडबद्दल जवळपास दर दुसऱ्या दिवशी आपले बोलणे व्हायचे. तुला प्रत्येक गोष्टीची इतकी सखोल माहिती असायची. संजय, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मित्रा, मला तुझी दररोज आठवण येईल,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटशैलीमुळे संजय गुप्ता यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीने एक अनुभवी दिग्दर्शक गमावला आहे.