दिव्या शिंदे ही बिग बॉस मराठी ६ मधील एक आक्रमक, स्पष्टवक्ती आणि स्ट्राँग स्पर्धक म्हणून ओळखली जात होती. टास्कमध्ये थेट मत मांडणं आणि ठाम भूमिका घेणं ही तिची ओळख होती. मात्र कालच्या भागात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे दिव्याचा बिग बॉसचा प्रवास अचानक संपला.
नेमकं काय घडलं?
बिग बॉस मराठी ६ च्या कालच्या भागात नॉमिनेशनचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये घरात राहण्यास पात्र नसलेल्या सदस्याच्या चेहऱ्यावर लाल रंगाने फुली मारायची होती. या टास्कदरम्यान तन्वीने दिव्याचं नाव घेतलं. हे ऐकताच दिव्याचा राग अनावर झाला. दरम्यान तन्वी आणि दिव्या यांच्यात मोठा वाद झाला. वाद इतका वाढला की 'बिग बॉस'ना स्वतः मध्यस्थी करावी लागली. बिग बॉसने दिव्याला शांत राहण्याचा प्रयत्न केला, मात्र दिव्या काही केल्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. टास्क संपल्यानंतर दिव्या सर्व घरातील सदस्यांसमोर उभी राहिली आणि बिग बॉसना उद्देशून म्हणाली की, तिला बिग बॉसचा आदर आहे आणि बिग बॉसवर विश्वास ठेवूनच ती या शोमध्ये आली आहे. ती पुढे म्हणाली, "मला एक गोष्ट इथे बोलायची आहे. मला खूप लोकांकडून एक गोष्ट सारखी ऐकू येत होती ती म्हणजे मी शोमध्ये बाहेरच्या गोष्टी बोलते. मला आठवत नाहीये मी नेमकं काय बोलले. पण, सर्वांना ऐकायचंच आहे तर एक गोष्ट मला सर्वांना खूप अधोरेखित करून सांगायची आहे."
यानंतर दिव्याने केलेलं वक्तव्य सगळ्यांनाच धक्का देणारं ठरलं. दिव्या म्हणाली की, ती बाहेर 'सरकार' म्हणून वावरते आणि तिच्या हातात तलवार असते. ती तलवार सध्या घरी असली तरी, इथल्या गोष्टी ती विसरणार नाही. "मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेन…आणि ती कोणावर चालवेन, हे तुम्ही माझ्याशी कसे आणि किती बोलता यावर अवलंबून आहे," असं ती म्हणाली. या वक्तव्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला.
'ही धमकीच आहे'- दिव्याची ठाम भूमिका
यानंतर रुचिता हिने दिव्याला थेट विचारलं की, "ही धमकी समजायची का आम्ही?" यावर दिव्याने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं, "हो, ही धमकीच आहे." दिव्याच्या या वक्तव्यानंतर तन्वी, रुचिता आणि अनुश्री यांनी एकत्रितपणे हे अतिशय चुकीचं असल्याचं सांगत तिला विरोध केला. एवढंच काय तर ज्याला दिव्या घरात मोठा भाऊ मानत होती, त्या राकेश बापटलाही तिचं बोलणं मान्य नव्हतं.
घरातील वाढता तणाव पाहून बिग बॉसने कडक शब्दांत हस्तक्षेप केला. "अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. आता एकही शब्द बोलायचा नाही," असं बिग बॉसने स्पष्ट केलं. संविधान, मानवी हक्क आणि महापुरुषांच्या विचारांची उदाहरणं देणारी व्यक्ती इथे धमकी देतेय, यावर बिग बॉसने तीव्र नाराजी व्यक्त केली. तरीही दिव्या "हो, ही धमकीच आहे" या भूमिकेवर ठाम राहिली.
बिग बॉसने केली हकालपट्टी
या गंभीर प्रकारानंतर बिग बॉसने दिव्या शिंदे आणि राकेश बापटला कन्फेशन रूममध्ये बोलावलं. दिव्याला तिची चूक सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र दिव्या माघार घ्यायला तयार नव्हती. बिग बॉसने तिला समजावण्याचा प्रयत्न करत स्पष्ट केलं की, नॅशनल टेलिव्हिजनवर घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणं अजिबात मान्य होऊ शकत नाही. हा शो कोट्यवधी लोक पाहतात आणि अशा वर्तनाला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं बिग बॉसने ठणकावून सांगितलं.
मात्र दिव्या माफी मागायला तयार नव्हती. अखेर सदस्यांच्या सुरक्षेचा विचार करत बिग बॉसने दंड स्वरूपात दिव्या शिंदेला तातडीने घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. ‘भाऊचा धक्का’ सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, दिव्या कोणालाही ‘सॉरी’ न म्हणता घराबाहेर पडली.
बरंच काही सांगायचं आहे.. घराबाहेर पडल्यानंतरची प्रतिक्रिया
घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदेच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट दिव्याच्या टीमकडून करण्यात आली असून त्यात म्हटलं आहे की, "दिव्याने बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर अनेक जण भावुक झाले आहेत तर काहींना धक्का बसला आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कृपया शांत राहा आणि कोणतीही नकारात्मकता किंवा चुकीची माहिती पसरवू नका. बरंच काही सांगायचं आहे..लवकरच सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील."
एक स्ट्राँग स्पर्धक म्हणून ओळख असलेल्या दिव्याला स्वतःच्या भाषेवर नियंत्रण न राहिल्याचा मोठा फटका बसला. आता या संपूर्ण प्रकरणावर दिव्या शिंदे स्वतः कधी आणि काय भाष्य करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.