मनोरंजन

Gautami Patil: गौतमी पाटील पहिल्यांदाच दिसणार रुपेरी पडद्यावर, अमेय वाघसोबत थिरकणार

Tejashree Gaikwad

Amey Wagh: काही दिवसांपूर्वी अमेय वाघसोबत पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या तरुणीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच ही अभिनेत्री कोण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर या गोष्टीवरून पडदा उठला असून ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आहे. नुकतेच तिचे आणि अमेय वाघचे 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटातील पहिले धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल असणाऱ्या 'लिंबू फिरवलंय' या भन्नाट गाण्याला अमितराज यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. तर वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. पॅनारॉमा म्युझिक लेबल असणाऱ्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांनी केले आहे.

प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे ऐकायला जितके जल्लोषमय आहे, तितकेच ते पाहायलाही कमाल आहे. 'लिंबू फिरवलंय' या गाण्याच्या निमित्ताने गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर तिचा जलवा दाखवणार आहे. त्यामुळे आपल्या नखरेल अदाकारांनी घायाळ करणारी गौतमी पाटील या गाण्यातून संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरुकर म्हणतात, "एक धमाल गाणे असायलाच हवे, असा अट्टाहास असल्याने 'लिंबू फिरवलंय' एक दमदार गाणे 'लाईक आणि सबस्क्राईब' मधून आम्ही घेऊन आलो आहोत. तुफान वाजणारे हे गाणे अतिशय कमाल चित्रित करण्यात आले आहे. संगीत टीम, नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. त्यात गौतमी पाटीलचा ठसकेबाज परफॉर्मन्स या गाण्यात अधिकच रंगत आणतो. त्यामुळे पुढे हे गाणे प्रत्येक समारंभात नक्की वाजेल, याची खात्री वाटते."

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरुकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून लेखन आणि दिग्दर्शनही अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. 'लाईक आणि सबस्क्राईब'मध्ये अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला