'मी मॅन-हेटर आहे'; 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील वक्तव्यानंतर शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई? जाणून घ्या नेमकं प्रकरण 
मनोरंजन

'मी मॅन-हेटर आहे'; 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील वक्तव्यानंतर शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई? जाणून घ्या नेमकं प्रकरण

'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये 'मी मॅन-हेटर आहे' असे वक्तव्य करणाऱ्या बिहारमधील शिक्षिका साक्षी झा वादात सापडली आहे. तिच्यावर निलंबनाची कारवाई झाली...

Mayuri Gawade

कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो वादग्रस्त वक्तव्ये, स्पर्धकांचे हटके परफॉर्मन्स आणि सोशल मीडियावरील चर्चांमुळे कायम चर्चेत असतो. आता या शोच्या दुसऱ्या पर्वातील एका स्पर्धकामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. बिहारमधील शिक्षिका आणि सोशल मीडिया क्रिएटर साक्षी झा हिने शोमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे ती टीकेची धनी ठरली. त्यानंतर तिच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत बिहार सरकारकडून किंवा शिक्षण विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

साक्षी झा शोमध्ये नेमकं काय म्हणाली?

१७ जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि यूट्यूबवर प्रदर्शित झालेल्या 'इंडियाज गॉट लेटेंट सीझन २' च्या तिसऱ्या भागात साक्षी झा सहभागी झाली होती. ऑडिशनदरम्यान तिने स्वतःची ओळख करून देताना, "मी मॅन-हेटर आहे. पुरुषांचा अहंकार दुखावण्यात मला आनंद मिळतो," असे म्हटले. यानंतर तिने, "माझं आयुष्याचं ध्येय म्हणजे दारू पिऊन नवऱ्याला मारणं," असेही वक्तव्य केले. तसेच, "मी कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही, पण मला पुरुषांचा द्वेष आहे," असेही ती म्हणाली.

तिच्या या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या एपिसोडमध्ये परीक्षकांनी तिला शून्य गुण दिले.

निलंबनाचा दावा, पण अधिकृत माहिती नाही

मनोरंजनविषयक 'मिसमालिनी' या पोर्टलने सोशल मीडियावर साक्षी झा हिला शिक्षिकेच्या नोकरीतून निलंबित करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, बिहार सरकार किंवा राज्याच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात कोणताही अधिकृत आदेश किंवा निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळे या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

समय रैनाची प्रेक्षकांना विनंती

दरम्यान, साक्षी झावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग आणि मीम्स व्हायरल होऊ लागल्यानंतर समय रैनाने सोशल मीडियावर प्रेक्षकांना आवाहन केले. तो म्हणाला, "साक्षी झावर अनेक मीम्स तयार होत आहेत. माझी एकच विनंती आहे, तिच्याशी नम्रतेने वागा. मीम्स हा इंटरनेटचा भाग आहे, पण त्यामागे एक व्यक्ती आहे, हे विसरू नका."

पुढे तो म्हणाला, "स्टेजवर परफॉर्म करणे सोपे नसते. कधी कधी विनोद करण्याच्या प्रयत्नात काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडल्या जातात. साक्षीमुळे हा भाग चर्चेत आला. त्यामुळे तिच्यावर द्वेष न करता तिच्याबद्दल सहानुभूती आणि आदर ठेवा."

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

SIR विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; CJP च्या आंदोलनाला पाठिंबा, ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा

...तर ठाण्यातील क्लस्टरवर विश्वास कसा ठेवायचा? केदार दिघेंचा महापालिकेला सवाल

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

फिल्मसिटीतील मैदानाला GMLR चा फटका; १७४ कोटी नुकसानभरपाई देण्याची महामंडळाची मागणी, BMC कडून २० कोटी देण्याचा प्रस्ताव