ऑस्कर स्पर्धेत मराठीचा ‘गोंधळ’; भारतातर्फे अधिकृत प्रवेशिकेसाठी निवड  
मनोरंजन

ऑस्कर स्पर्धेत मराठीचा ‘गोंधळ’; भारतातर्फे अधिकृत प्रवेशिकेसाठी निवड

संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची ९९ व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर २०२७) 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट' या श्रेणीत भारताची अधिकृत एण्ट्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची ९९ व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर २०२७) 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट' या श्रेणीत भारताची अधिकृत एण्ट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'ने शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.

९९ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवार, १४ मार्च २०२७ रोजी पार पडणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या १० दिवसांत विविध भाषांमधील ३३ चित्रपटांचे स्क्रिनिंग करण्यात आले. या वर्षी आमच्याकडे ४ मराठी, १४ हिंदी आणि इतर भाषांमधील उत्तम चित्रपट आले होते. अंतिम निर्णयासाठी प्रदीर्घ चर्चा झाली. अंतिम शर्यतीत 'गोंधळ' व्यतिरिक्त 'अंग' आणि 'इक्कीस' हे चित्रपट अव्वल तीनच्या यादीत होते, असे शेषाद्री म्हणाले.

पार्श्वभूमी आणि कथा

ग्रामीण महाराष्ट्रातील पारंपरिक विधी 'गोंधळ' आणि एका रात्रीच्या घडामोडींवर हा चित्रपट आधारित आहे. शोषक लग्नात अडकलेली 'सुमन' नावाची महिला, तिचा गुप्त प्रेमी आणि त्यांच्याकडून रचला जाणारा कट, ज्यामध्ये भक्ती, कपट आणि नियतीचा खेळ पाहायला मिळतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. इशिता देशमुख (मुख्य भूमिका), किशोर कदम, योगेश सोहनी, निषाद भोईर, अनुज प्रभु आणि ध्रुव ठोके यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. तर इलैया राजा संगीतकार आहेत.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

२०२५ मध्ये पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'गोंधळ'चा वर्ल्ड प्रीमियर झाला होता. तेथे संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा 'रजत मयूर' पुरस्कार मिळाला होता. एफएफआयकडे सादर केलेल्या ३३ चित्रपटांच्या यादीत यामी गौतमचा 'हक्क', आदित्य धरचा 'धुरंधर' व 'धुरंधर: द रिव्हेंज', 'हनुमान अंश', सनी देओलचा 'बॉर्डर २', इम्तियाज अलीचा 'मै वापस आऊंगा', राम चरणचा 'पेड्डी' आणि फरहान अख्तरचा '१२० बहादूर' यांसारख्या बड्या चित्रपटांचा समावेश होता.

चौथा मराठी चित्रपट

'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' आणि 'कोर्ट'नंतर ऑस्करच्या शर्यतीत उतरणारा 'गोंधळ' हा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे. गेल्या वर्षी नीरज घेवान यांचा 'होमबाऊंड' हा चित्रपट भारताकडून पाठवण्यात आला होता, परंतु तो अंतिम नामांकनापर्यंत पोहोचू शकला नाही. आतापर्यंत भारताकडून केवळ 'मदर इंडिया', 'सलाम बॉम्बे' आणि 'लगान' या तीनच चित्रपटांनी ऑस्करच्या अंतिम ५ नामांकनांमध्ये स्थान मिळवले आहे. (दीपा मेहता यांच्या 'वॉटर' चित्रपटालाही नामांकन मिळाले होते, मात्र तो कॅनडाकडून पाठवण्यात आला होता.)

Mumbai : १३६ फेरीवाल्यांवर कारवाई; दहिसरमध्ये पादचारी प्रथम अभियानाला वेग

दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्राच्या मदतीसाठी न थांबता मदत करू; दुष्काळी स्थितीबाबत फडणवीसांचा खुलासा

दोन गटांना दोन नावे,दोन चिन्हे; तृणमूल काँग्रेसमधील वादाबाबत निवडणूक आयोगाचा फैसला, ‘लोकशाहीतील काळा दिवस’

मराठा आरक्षण याचिका नव्या पूर्णपीठासमोर; न्यायमूर्ती कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपीठ, ९ ऑक्टोबरपासून होणार नव्याने सुनावणी