"कुत्र्याची शेपूट वाकडीच...त्याच्या तोंडाला काळं फासून..."; शक्तिमानची खिल्ली उडवल्याने मुकेश खन्ना भडकले, समय रैनाला चांगलेच झापले  
मनोरंजन

"कुत्र्याची शेपूट वाकडीच...त्याच्या तोंडाला काळं फासून..."; शक्तिमानची खिल्ली उडवल्याने मुकेश खन्ना भडकले, समय रैनाला चांगलेच झापले

'काहीही करा, पण कुत्र्याची शेपूट वाकडीच राहते', 'त्याच्या तोंडाला काळं फासून गाढवावरुन धिंड काढायला पाहिजे' अशा अत्यंत कठोर शब्दांत अभिनेते मुकेश खन्ना यांनी कॉमेडियन समय रैनाला फटकारलं आहे.

Mayuri Gawade

'काहीही करा, पण कुत्र्याची शेपूट वाकडीच राहते', 'त्याच्या तोंडाला काळं फासून गाढवावरुन धिंड काढायला पाहिजे' अशा अत्यंत कठोर शब्दांत अभिनेते मुकेश खन्ना यांनी कॉमेडियन समय रैनाला फटकारलं आहे. गेल्या वर्षी 'इंडियाज गॉट लेटेंट'वरून झालेल्या गदारोळानंतर समय अलीकडेच पहिल्यांदा 'स्टिल अलाईव्ह' या नव्या शोमधून समोर आला आणि त्याच्या विधानांमुळे नवा वाद भडकला आहे.

समय रैनाने दोन दिवसांपूर्वीच (बुधवारी) यूट्यूबवर ‘स्टिल अलाईव्ह’ या त्याच्या नवीन शोचा व्हिडिओ पोस्ट केला. यातून त्याने गेल्यावर्षीच्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आणि काही जणांवर टीकाही केली. गेल्यावर्षी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या प्रकरणानंतर रणवीर, आशीष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजा यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यावेळी मुकेश खन्ना यांनीही समयवर निशाणा साधला होता. आता त्याच टीकेला समयने आपल्या नव्या व्हिडिओतून उत्तर दिलं आहे.

समय रैनाने उडवली शक्तिमानची खिल्ली

समय रैनाने त्याच्या नव्या शोमध्ये म्हटलंय की, ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादावरून त्याच्यावर टीका होत असताना मुकेश खन्नांनीही विनाकारण निशाणा साधला होता. याबाबत सांगताना तो म्हणाला, "त्यावेळी ज्यांचं त्या प्रकरणाशी काही देणंघेणंही नव्हतं ते सगळे प्रकाशझोतात राहण्यासाठी आले होते....शक्तिमानही आला होता यार...शक्तिमानशी कसंकाय लढणार? 'सॉरी शक्तिमान'... त्यावेळी, लहान मुलांवर माझ्या कंटेंटचा अयोग्य परिणाम होईल असं ते (मुकेश खन्ना) म्हणाले होते....पुढे तो म्हणाला - तुमच्यापैकी किती जण तेव्हा शक्तिमान बघायचे याची मला कल्पना नाही, पण त्यावेळी दर महिन्याला बातमी यायची की...शक्तिमान पाहून एखाद्या लहान मुलाने इमारतीवरून उडी मारली....तू तर मुलांना मारलंय शक्तिमान....तू काय नैतिकता शिकवणार....असं म्हणत त्याने प्रचंड खिल्ली उडवली.

"निर्लज्जासारखा परत आलाय..." मुकेश खन्नांचा संताप

समयच्या वक्तव्यानंतर मुकेश खन्ना चांगलेच भडकले. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक एआय (AI) फोटो शेअर केला, ज्यामध्ये समय रैनाचे तोंड काळे करून त्याला गाढवावर बसवलेले दाखवण्यात आले आहे.

या फोटोसोबत त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत कॅप्शन लिहिलं आहे -"काहीही करा, पण कुत्र्याची शेपूट वाकडीच राहते. समय रैनालाही शेपटी आहे. तुम्ही तिला कितीही मारले किंवा सरळ केले तरी ती पुन्हा वाकडीच होते."

यापुढे त्यांनी लिहिलं, "समय साधासुधा प्राणी नाही. तो 'रोस्टेड' प्राणी आहे. संपूर्ण देशानं त्याला लाथाडलं. तरी तो निर्लज्जासारखा परत आलाय, अजून मार खाण्यासाठी. आता फक्त एकच गोष्ट उरली आहे. त्याचं तोंड काळं करून गाढवावर बसवून देशभरातून, गल्लीबोळातून त्याची धिंड काढायला हवी. जिथे लहान मुले त्याच्यावर अंडी आणि टोमॅटो फेकतील. कारण त्यानं त्यांच्या सुपरहिरो, शक्तिमानचा अपमान केलाय!!!" अशा शब्दांत मुकेश खन्ना यांनी समय रैनाच्या टीकेवर सडेतोड उत्तर दिलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांमध्ये समयचा व्हिडिओ आणि मुकेश खन्ना यांची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून संमीश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

समय रैनासह ५ कॉमेडियन्सना 'सर्वोच्च' दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणातील सर्व FIR रद्द

स्वातंत्र्यदिनाआधी दिल्ली उच्च न्यायालय, विमानतळासह अन्य ठिकाणी बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

'हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण?' NALSAR प्रकरणात सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा BCI ला सवाल

ST च्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय

अल्पवयीन मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न; ATS कडून आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश