‘हमीदाबाईची कोठी’ हे नाटक मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलं. यामध्ये नाना पाटेकर, अशोक सराफ, नीना कुलकर्णी, प्रदीप वेलणकर, भारती आचरेकर अशा सगळ्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या नाटकाचं दिग्दर्शन विजयाबाईंनी केलं होतं. एकदा हे सगळे कलाकार नाटकाच्या दौऱ्यावर गेले असता अशोक सराफ यांना पाहण्यासाठी संपूर्ण गाव आलं होतं.
यादरम्यान एवढा गोंधळ झाला होता की, नाना पाटेकरांनी अशोक सराफ यांना भर गर्दीतून सुखरुपपणे बाहेर काढत, त्यांचा जीव वाचवला होता. “हमीदाबाईची कोठी’ या नाटकाचा प्रयोग एका मिलमध्ये होणार होता आणि तिथे रंगमंच नव्हता. त्याठिकाणी एक चौथरा होता, त्यावर सेट लावला होता. रंगमंच नसल्याने ते नाटक पाठीमागच्या लोकांना दिसत नव्हतं. सगळे वाकून-वाकून पाहत होते. मग, प्रेक्षकांचा गोंधळ झाल्यावर पडदा पाडला. नाटक बंद झालं म्हटल्यावर आम्ही सगळे आत जाऊन बसलो. शेवटी लोकांनी सगळ्या खुर्च्या तोडल्या, ट्युबलाइट्स फोडल्या, ड्रायव्हर खाली जाऊन झोपला होता, त्याला बाहेर काढून लोकांनी मारलं. इतका गोंधळ झाला की, सगळे स्टेजवर यायला धडपडायला लागले. या सगळ्यात नानाला माहिती होतं लोक येऊन आधी मला धरणार.
तो म्हणाला, ‘चल अशोक पटकन.’ मला घेऊन तो मागून बाहेर पडला, सगळा काळोख होता. त्या काळोखात खाली सगळा चिखल होता. त्या चिखलातून आम्ही पळत-पळत मुख्य रस्त्यावर आलो. मग त्याने एक रिक्षा थांबवली. तो रिक्षावाला म्हातारा होता. नानाने त्या म्हाताऱ्याला उतरवून मागे माझ्या बाजूला बसवलं आणि नाना स्वत: ती रिक्षा घेऊन निघाला. रेस्टहाऊस खूप लांब होतं त्याने ती रिक्षा नेली, तिकडे मला एका खोलीत सोडलं आणि परत तो नाटकाच्या प्रयोगाच्या ठिकाणी गेला. बाकीच्या लोकांना आणलं. तोपर्यंत थिएटर फोडून सगळ्या लोकांनी वाट लावली होती. नाहीतर मी लोकांच्या हातात सापडलो असतो तर माझेही तुकडे केले असते.
काहीवेळाने मी रेस्टहाऊसवरून परत यांच्याकडे जायला निघालो कारण, या लोकांची मला काळजी वाटत होती. मग वाटेत हे लोक रिक्षातून येताना दिसले. आम्हाला सगळ्यांना रेस्टहाऊसवर बंद केलं. त्यानंतर मग रात्री ३ वाजता रेस्टहाऊसच्या पुढे एक पोलिसांची गाडी आणि मागे एक गाडी आणि मध्ये आमची बस… असे आम्ही सगळेजण त्या गावातून बाहेर पडलो. तो नाटकाचा प्रयोग मी कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी तो प्रसंग कथन केला.