मनोरंजन

‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल-रितेश देशमुखची खास भेट; ऐतिहासिक चित्रपटाविषयी रंगली सखोल चर्चा

बहुप्रतिक्षित महाचित्रपट 'राजा शिवाजी' येत्या १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलने ‘राजा शिवाजी’च्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा देत, ऐतिहासिक विषयावर इतक्या भव्य स्वरूपात चित्रपट...

Krantee V. Kale

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, संघर्ष, नेतृत्व आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास यावर आधारित बहुप्रतिक्षित महाचित्रपट 'राजा शिवाजी' येत्या १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा ऐतिहासिक महाचित्रपट भारताच्या गौरवशाली इतिहासाला भव्य सिनेमॅटिक रूप देण्यास सज्ज आहे. चित्रपटगृहांमध्ये हा भव्य चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता विकी कौशल आणि ‘राजा शिवाजी’मधून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा रितेश देशमुख एकाच फ्रेममध्ये दिसले. सोशल मीडियावर या क्षणाची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे.

'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे विशेष चर्चेत आलेल्या विकी कौशलने नुकतीच रितेशची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये ‘राजा शिवाजी’च्या निर्मितीप्रवासाविषयी, ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अशा भव्य चित्रपटाच्या निर्मितीमागील मेहनतीबाबत सखोल संवाद रंगला. तसेच विकीने ‘राजा शिवाजी’च्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा देत, ऐतिहासिक विषयावर इतक्या भव्य स्वरूपात चित्रपट साकारण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या चर्चेदरम्यान रितेश विलासराव देशमुख यांनी ‘राजा शिवाजी’साठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा चार वेगवेगळ्या भूमिका कशा सांभाळल्या, याविषयी मनमोकळेपणाने अनुभव शेअर केले. ऐतिहासिक विषयावर काम करताना घेतलेली तयारी, व्यक्तिरेखांच्या मांडणीत ठेवलेली बारकाई, तसेच द्विभाषिक चित्रपटाच्या चित्रीकरणातील आव्हाने आणि अनुभव याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना एका चित्रपटासाठी एकत्र आणण्यामागील नियोजन आणि या भव्य प्रकल्पाची व्याप्ती याविषयीही त्यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.

निर्मात्यांकडून या भेटीची केवळ एक झलक प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आली असून, विकी कौशल आणि रितेश देशमुखच्या या खास भेटीचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

‘राजा शिवाजी’मध्ये दिग्गज कलाकारांची भव्य फळी

‘राजा शिवाजी’मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भव्य फळी एकत्र आली आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांच्या प्रभावी उपस्थितीमुळे चित्रपटाची भव्यता अधिक वाढली आहे. या संपूर्ण टीमचे नेतृत्व रितेश विलासराव देशमुख करत असून, त्यांनी लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशा सर्वच जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. 'जिओ स्टुडिओज'द्वारे सादर करण्यात आलेला आणि 'मुंबई फिल्म कंपनी'ची निर्मिती असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केला आहे.

भव्य दृश्यरचना, दमदार कथा, ऐतिहासिक भावविश्व आणि प्रेरणादायी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mumbai Local Update : उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील अनेक लोकल रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Surat Fire : सुरतमधील कापडाच्या गोदामाला भीषण आग; परिसरात धुराचे प्रचंड लोट, घटनेचा Video समोर

Microsoft Global Outage : जगभरातील युजर्सना मोठा दिलासा! मायक्रोसॉफ्टच्या सर्व सेवा सुरू, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू

US Flight Chaos : अमेरिकेची विमानसेवा ठप्प; लाखो प्रवाशांचे हाल, नेमकं काय घडलं?