सोशल मीडियाच्या जगात आज ‘लाइक्स’, ‘फॉलोअर्स’ आणि ‘अटेंशन’ या तीनच गोष्टींची चलती आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रील्समुळे तरुणाई बदलत आहे, संबंध बदलत आहेत, ‘क्षणिक ओळखी’चं आकर्षण निर्माण होतंय, तर यातून फसवणूक होत असल्याचं अनेकदा समोर येतं. पण, सोशल मीडियाच्याच या गोंधळात खऱ्या प्रेमाची एक प्रेरणादायी कहाणी जगासमोर आली. ही कहाणी आहे सोलापूरच्या अंजली शिंदे आणि आकाश नारायणकर यांची. या दोघांच्या प्रेमाची आणि जगण्याच्या संघर्षाची कथा थेट साऊथच्या मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
रीलच्या जगातला रिअल संघर्ष
तर, आकाश आणि अंजली आहेत रीलस्टार. हे दोघेही सोशल मिडियावर विनोदी व्हिडिओ करत प्रसिद्ध झाले. अंजलीबाईचे इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओही व्हायरल झाले. पण, या सुखी संसारात भलं मोठं वादळ आलं. अंजलीला अचानक ब्रेनट्यूमर असल्याचं निदान झालं. अन् हसत-खेळत असणारी अंजली बेडला खिळून राहिली. तसे हे दोघे मध्यमवर्गीयच. दोघांनाही आई-वडिल नाहीत.
अंजलीची अचानक झालेली ही अवस्था पाहून आकाशच्या पायाखालची जमीन सरकली. पण, आकाशही तितकाच हट्टी. आपण सावित्रीने यमाकडून पतीचे प्राण परत आणले असे ऐकले आहे. पण, आकाशने खऱ्या आयुष्यात अंजलीचे प्राण यमाकडून आणले असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
अंथरूणाला खिळलेल्या अंजलीसाठी नवरा देवदूत
या संपूर्ण वेदनादायी प्रवासाचं चित्रण करून आकाश रील बनवत होता. त्याचा संपूर्ण संघर्ष त्याने रीलच्या माध्यमातून दाखवला आहे. त्याने अंजलीच्या आजारपणात उपास केले, नवस केले, मदत मागितली, पैसे उभे केले. अंथरूणाला खिळलेल्या अंजलीला चालायला शिकवले, पुन्हा पायावर उभं राहायला शिकवलं.
तिचे ब्रेन ट्यूमरने केस गेले तर त्यानेही स्वत: टक्कल केलं. एवढंच नव्हे तर चार भिंतीत ट्रीटमेंट घेऊन कंटाळलेल्या अंजलीला सलाईनची बॉटल हातात घेऊन त्याने तिला निसर्गाच्या सानिध्यात आणलं. आकाशच्या या प्रयत्नांमुळे अंजलीचा जणू पुनर्जन्म झाला.
साऊथमध्ये मराठी जोडप्याची प्रेरणा
एका चित्रपटासारखी वाटणारी ही प्रेरणादायी कथा दाक्षिणात्य चित्रपट निर्माते कुमार यांच्या नजरेस पडली. आता ही प्रेमकहाणी ‘Love You Muddu’ या नावाने ७ नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात रेश्मा लिंगराजप्पा या अभिनेत्रीने अंजलीची भूमिका केली असून अभिनेता सिद्धू मूलीमनी याने आकाशची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रोमोलाही आकाश-अंजली यांना खास आमंत्रित केले होते. यावेळी सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळले. या मराठमोळ्या जोडप्याचे कौतुक आता संपूर्ण साऊथमध्ये होत आहे.