

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील अमेरिकन दूतावासाजवळ सोमवारी (दि.२) रात्री उशिरा मोठा स्फोट झाला. दूतावासाच्या परिसरातून काळ्या धुराचे प्रचंड लोट उसळताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सौदी संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, दूतावासाच्या संकुलावर दोन ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इमारतीचे किरकोळ नुकसान झाले असून मर्यादित स्वरूपाची आग लागली होती. परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये इमारतीला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसत आहे.
अमेरिकेचा 'शेल्टर इन प्लेस' सल्ला
घटनेनंतर रियाध, जेद्दाह आणि धहरान (Riyadh, Jeddah and Dhahran) येथील अमेरिकन नागरिकांना 'शेल्टर इन प्लेस' अर्थात घरातच सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच लष्करी तळांच्या परिसरात अनावश्यक हालचाली टाळण्याचे निर्देश अमेरिकन दूतावासाने जारी केले आहेत.
कुवैत आणि जॉर्डनमधील दूतावास लक्ष्य
त्याच दिवशी कुवैत आणि जॉर्डनमधील अमेरिकन दूतावासांनाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली. जॉर्डनची राजधानी अम्मान येथे संभाव्य सुरक्षा धोक्याच्या पार्श्वभूमीवर दूतावासातील कर्मचाऱ्यांना तात्पुरते सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
बगदादमध्ये सलग दुसऱ्या दिवशी चकमकी
इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकन दूतावासाजवळ सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने आणि चकमकी घडल्या. इराणवरील अमेरिकन आणि इस्रायली कारवाईविरोधात संतप्त झालेल्या आंदोलकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. त्यावर सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा मारा केला. काही निदर्शकांनी जिवंत गोळ्याही झाडल्याचा आरोप असून, ग्रीन झोनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना काही सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इराणमध्ये ५५५ जणांचा मृत्यू
दरम्यान, अमेरिकन आणि इस्रायली सैन्याने इराणमधील अनेक शहरांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ५५५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तेहरानने केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने गल्फ परिसरात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानातही हिंसक आंदोलन
पाकिस्तानातील कराची आणि लाहोर येथे अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर हिंसक आंदोलन झाले. या चकमकींमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी कारवाई चार ते पाच आठवडे सुरू राहू शकते, असे संकेत दिले आहेत. अमेरिकेने आपल्या नागरिकांना मध्यपूर्वेतील काही भाग तात्काळ सोडण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही या प्रदेशात गंभीर सुरक्षा धोके असल्याचा इशारा दिला आहे.
मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असून, जागतिक ऊर्जा पुरवठा आणि परदेशी नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.