पूँछ : जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रणरेषेजवळ सुरुंग स्फोटात भारतीय लष्करातील ‘जाट रेजिमेंट’चा (अग्निवीर) सैनिक शहीद झाला, तर ‘जेसीओ’ व एक जवान जखमी झाला. जखमींना तत्काळ उधमपूरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हवेली तालुक्यातील सलोत्री गावात व्हिक्टर पोस्टजवळ दुपारी १२ वाजता स्फोट झाला. हे भूसुरुंग घुसखोरी रोखण्यासाठी रचलेले होते. भारतीय लष्कराच्या ०७ जाट रेजिमेंटच्या जवानांची गस्त सुरू असताना त्याचा स्फोट झाला. ७ जाट रेजिमेंटचे नायब सुभेदार हरि राम, हवालदार गजेंद्र सिंह आणि अग्निवीर ललित कुमार हे सीमेवरील चौकीवर गस्त घालत होते. तेव्हा ‘एम-१६’ भूसुरुंगाच्या स्फोटात ते सापडले. या स्फोटात अग्निवीर ललित कुमार शहीद झाले, तर हवालदार गजेंद्र सिंह आणि सूभेदार हरि राम गंभीर जखमी झाले.
स्थानिक प्रशासन व लष्कराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.