इस्लामाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमधील पुढील अमेरिकी राजदूत म्हणून नताली बेकर यांच्या नावाची शिफारस (नामांकन) केली आहे. त्यामुळे जवळपास दोन वर्षांच्या खंडानंतर इस्लामाबादमध्ये कायमस्वरूपी अमेरिकी राजदूताची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेकर सध्या इस्लामाबाद येथील अमेरिकी दूतावासात प्रभारी राजनैतिक अधिकारी (चार्ज डी अफेअर्स) म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये तत्कालीन अमेरिकी राजदूत डोनाल्ड आर्मिन ब्लोम यांनी पद सोडल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.
सिनेटची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर बेकर यांची पाकिस्तानमधील अमेरिकी राजदूत म्हणून नियुक्ती केली जाईल. अमेरिकेत, राजदूतांची नियुक्ती राष्ट्राध्यक्षांकडून केली जाते, परंतु त्यासाठी सिनेटची मंजुरी आवश्यक असते. व्हाईट हाऊसने पाठवलेल्या या नामांकनाची प्रथम सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीकडून समीक्षा केली जाईल. समितीच्या मंजुरीनंतर संपूर्ण सिनेटमध्ये मतदानाद्वारे शिक्कामोर्तब झाल्यावर नताली बेकर अधिकृतपणे राजदूतपदाचा कार्यभार स्वीकारतील.
बेकर या अमेरिकन सीनियर फॉरेन सर्व्हिसच्या वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी कतार (दोहा), लिबिया, कुवेत, दुबई (इराण प्रादेशिक कार्यालय) आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात उत्तर आफ्रिकन व्यवहार विभागाच्या संचालक म्हणून महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.