आंतरराष्ट्रीय

भारत ‘तटस्थ’ नाही, कायमच शांततेच्या बाजूने; पंतप्रधान मोदी यांचे झेलेन्स्कींपुढे स्पष्ट प्रतिपादन

भारत ‘तटस्थ’ नाही, तर कायमच शांततेच्या बाजूने उभा आहे. मी बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहे. तेथे...

Swapnil S

कीव्ह : भारत ‘तटस्थ’ नाही, तर कायमच शांततेच्या बाजूने उभा आहे. मी बुद्धाच्या भूमीतून आलेलो आहे. तेथे युद्धाला कोणतेच स्थान नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेत केले.

रशिया व युक्रेन यांच्यात अडीच वर्षे युद्ध सुरू आहे. ते सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी युक्रेनला पोहचले. यावेळी त्यांनी राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यासोबत तीन तास चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. बैठकीपूर्वी मोदी यांनी युद्धात मरण पावलेल्या लहान मुलांना श्रद्धांजली अर्पण केली. भारत आणि युक्रेनमध्ये यावेळी ४ करार झाले आहेत.

ते म्हणाले की, मी काही दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटलो होतो. तेव्हा मी प्रसारमाध्यमांसमोर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले होते, ही युद्धाची वेळ नाही. आम्ही महात्मा गांधी यांच्या भूमीतून येतो. त्यांनी पूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला आहे. १४० कोटी भारतीयांची भावना मानवतेने भरलेली आहे. मी युक्रेनच्या भूमीवर शांततेचा संदेश घेऊन आलो आहे. या युद्धात मरण पावलेल्या लहान मुलांबाबत मला दु:ख झाले आहे. सभ्य समाजात युद्धात मुलांचा मृत्यू होणे स्वीकारार्ह नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

युद्धाच्या सुरुवातीला भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात तुम्ही मदत केलीत याबद्दल मी तुमचा आभारी आहे. युद्धाच्या काळात भारत हा युक्रेनला मानवी मदत करण्याबाबत कायम पाठिशी उभा आहे, असे मोदी म्हणाले.

मोदी व झेलेन्स्की भेटीनंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, तेल खरेदी करण्याचा निर्णय हा बाजारपेठेशी संबंधित होता. यामागे कोणतेही राजकारण नाही.

युक्रेनला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान

१९९१ ला सोव्हिएत संघ फुटल्यानंतर युक्रेनची निर्मिती झाली. आतापर्यंत कोणताही भारतीय पंतप्रधान युक्रेनला गेला नव्हता. युक्रेनला जाणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. भारताने युक्रेनला मानवीय मदत म्हणून झेलेन्स्की यांना ‘भीष्म’ वैद्यकीय क्युब भेट दिला. हे किट युद्धात जखमी सैनिकांच्या उपचारासाठी मदत करेल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?