(Photo-X)
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू

सौदी अरेबियातील रियाध येथे क्षेपणास्त्र हल्ल्यात सिटापूरच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. पत्नीशी बोलत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

किशोरी घायवट-उबाळे

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणखी एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील सिटापूर येथील २६ वर्षीय रवी गोपाल याचा सौदी अरेबियातील रियाध येथे क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला. हल्ल्याच्या वेळी तो पत्नीसोबत कॉलवर बोलत होता. दुर्दैवाने, त्या दोघांचं ते शेवटचं बोलणं ठरलं.

पत्नीशी बोलताना अचानक कॉल कट झाला...

रवी गोपाल १८ मार्चच्या रात्री सुमारे ८.३० वाजता आपल्या पत्नीशी फोनवर बोलत होता. २० मिनिटे फोनवर गप्पा झाल्यानंतर पत्नी रितूला मोठ्या स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर त्याचा कॉल अचानक कट झाला.

रितुने सांगितले, "फोन अचानक बंद झाला. पुन्हा कॉल केला तर तो स्विच ऑफ लागला. त्यांच्या मित्रांशीही माझा संपर्क होऊ शकला नाही." यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राने रवीच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना दिली.

प्लास्टिक कारखान्यात काम, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

रवी गोपाल हा सौदी अरेबियातील एका प्लास्टिक कारखान्यात कामाला होता. त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

रवी हा कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्याचे लग्न सप्टेंबर २०२० मध्ये झाले होते. त्यानंतर तो नोकरीसाठी सौदी अरेबियात गेला होता.

हल्ल्याचे कारण काय?

१८ मार्च रोजी सौदी अरेबियाने दावा केला होता की, रियाधकडे येणारी चार क्षेपणास्त्रे त्यांनी पाडली. मात्र, त्यातील काही अवशेष शहराजवळील भागात पडले.

प्राथमिक माहितीनुसार, या अवशेषांपैकी एक रवी गोपालला लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

कुटुंबाची सरकारकडे मदतीची मागणी

रवीच्या कुटुंबीयांनी सरकारकडे मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत तसेच आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अजून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी त्वरित कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र, अजून रवीचा मृतदेह भारतात आणलेला नाही.

मध्य पूर्वेतील संघर्षात भारतीयांचा मृत्यू

पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र होत असताना यामध्ये आतापर्यंत किमान ६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

१४ मार्च रोजी ओमानमधील सोहर येथे ड्रोन हल्ल्यात २ भारतीयांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी सौदी अरेबियातील अल-खर्ज येथेही एका भारतीयाचा मृत्यू झाला होता.

या घटनांमुळे परदेशात काम करणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

भारताची मोठी कामगिरी; कल्पक्कममध्ये जगातील पहिला अणुभट्टीच्या उष्णतेवर चालणारा हायड्रोजन प्रकल्प सुरू

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

ठाण्यात ४० टक्के पाण्याची गळती; आमदार संजय केळकर यांचा आरोप

Mumbai : उच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड; FIR ची प्रत नाकारणे अधिकाऱ्याला भोवले