

चेन्नई : स्वच्छ आणि कमी कार्बन उत्सर्जनाच्या ऊर्जा क्षेत्रात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अणुऊर्जा विभागाने (DAE) शुक्रवारी (दि.२६) तामिळनाडूतील कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात (IGCAR) फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर (FBTR) मधून निर्माण होणाऱ्या उष्णतेचा वापर करून हायड्रोजन निर्मिती करणाऱ्या जगातील पहिल्या प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे भविष्यात अणुऊर्जा ही केवळ वीज निर्मितीपुरती मर्यादित न राहता कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या स्वच्छ हायड्रोजनच्या निर्मितीसाठीही महत्त्वाचा स्रोत ठरणार आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी, "स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि अणुऊर्जेचे एकत्रीकरण हे शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. मोठ्या प्रमाणावर कार्बनमुक्त हायड्रोजन उत्पादनासाठी अणुऊर्जा प्रभावी पर्याय ठरू शकते," असे सांगितले.
काय आहे Cu-Cl थर्मोकेमिकल सायकल?
हा प्रायोगिक प्रकल्प कॉपर-क्लोरिन (Cu-Cl) थर्मोकेमिकल सायकल या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रक्रियेत पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन करण्यासाठी विजेऐवजी प्रामुख्याने अणुभट्टीतून मिळणाऱ्या उष्णतेचा वापर केला जातो. कॉपर आणि क्लोरिन संयुगांच्या रासायनिक अभिक्रियांच्या मालिकेतून हायड्रोजनची निर्मिती केली जाते.
BARC आणि IGCARचे संयुक्त तंत्रज्ञान
हे अत्याधुनिक तंत्रज्ञान भाभा अणुसंशोधन केंद्राने (BARC) विकसित केले असून, त्याचे IGCAR मधील फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टरसोबत यशस्वी एकत्रीकरण करण्यात आले आहे. भारतातील ही एकमेव कार्यरत फास्ट रिॲक्टर संशोधन सुविधा असून, या प्रकल्पामुळे भारताच्या त्रिस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रमाला स्वच्छ इंधन निर्मितीची नवी दिशा मिळाली आहे.
ऊर्जा सुरक्षेला मिळणार बळ
अणुऊर्जा विभागाच्या मते, या प्रकल्पातून मिळणारा अनुभव भविष्यात प्रगत अणुभट्ट्यांसोबत मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन उत्पादनासाठी उपयोगी ठरणार आहे. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होण्यास मदत होईल, तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टालाही चालना मिळणार आहे.