युद्ध संपविण्याचा करार करण्यास इराण उतावीळ; ट्रम्प प्रशासनाचा दावा 
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : युद्ध संपविण्याचा करार करण्यास इराण उतावीळ; ट्रम्प प्रशासनाचा दावा

अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या युद्धविराम सुरू असून हे युद्ध संपविण्यासाठीचा करार करण्यास इराण उतावीळ झाला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या युद्धविराम सुरू असून हे युद्ध संपविण्यासाठीचा करार करण्यास इराण उतावीळ झाला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाचा असा युक्तिवाद आहे की, इराणमधील युद्ध एप्रिलच्या सुरुवातीला सुरू झालेल्या शस्त्रसंधीमुळे आधीच संपले असल्याने व्हाइट हाऊसला काँग्रेसची मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनाने केला आहे.

ट्रम्प यांनी दावा केला आहे की, सध्या स्थगित असलेल्या युद्धाला संपवण्यासाठी इराण करार करण्यास 'अत्यंत उत्सुक' आहे. त्याचबरोबर त्यांनी सध्या तरी हवाई हल्ले पुन्हा सुरू करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी दुपारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले. हा काळ असा आहे जेव्हा इराणने इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने पुन्हा युद्ध सुरू केले तर ते नवीन हल्ले करतील. दोन्ही देशांमधील युद्ध ८ एप्रिल रोजी झालेल्या युद्धविरामानंतर स्थगित आहे.

आम्ही त्यांची अण्वस्त्र क्षमता पूर्णपणे नष्ट केली आहे, होर्मुझच्या आखातातील अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यांना तेलापासून कोणताही पैसा मिळत नाही. आम्हाला आशा आहे की हे प्रकरण लवकरच सोडवले जाईल, असेही ते म्हणाले. "इराण करार करण्यास अत्यंत उत्सुक आहे," असा दावा ट्रम्प यांनी केला आणि पुढे जोडले की या वाटाघाटींची माहिती केवळ काही मोजक्याच लोकांना आहे. माझ्या आणि इतर दोन-तीन लोकांव्यतिरिक्त कोणालाही या वाटाघाटींबद्दल काहीच माहीत नाही, असे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, शस्त्रसंधीमुळे युद्ध तात्पुरते थांबले असल्याचा दावा संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी गुरुवारी सिनेटमध्ये दिलेल्या साक्षीदरम्यान केला. १९७३ च्या कायद्यानुसार, ६० दिवसांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या लष्करी कारवाईसाठी काँग्रेसची औपचारिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने अद्याप ही मंजुरी घेतलेली नाही.

५८० जहाजे अडकली

मध्यपूर्वेतील सततच्या तणावामुळे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक जवळजवळ थांबली आहे. पूर्वी दररोज सुमारे १३० जहाजे येथून जात असत, पण आता १० पेक्षा कमी जहाजे जात आहेत. याचा अर्थ या मार्गावरील वाहतूक ९० टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाली आहे. अहवालानुसार, गेल्या दोन महिन्यांत या भागात अनेक जहाजांवर हल्ले झाले, काहींचे नुकसान झाले, तर इतरांना धमकावून परत पाठवण्यात आले. यामुळे, सुमारे ५८० मोठी जहाजे आखातात अडकून पडली आहेत. या जहाजांवर सुमारे २० हजार खलाशीही अडकले असून, त्यांना हालचाल करता येत नाही. अधिकाऱ्यांच्या मते, त्यांची सुरक्षितता ही प्राथमिक चिंता आहे. जहाजांवरील अत्यावश्यक वस्तूंचा साठाही कमी होत आहे आणि दीर्घकाळ अडकून पडल्यामुळे खलाशांवरील मानसिक ताण वाढत आहे.

इराणची ताकद कमी

युद्धविराम मोडण्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, मला माहीत नाही की आपल्याला (युद्धविराम मोडण्याची) गरज आहे की नाही. अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे इराणची ताकद मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. ट्रम्प म्हणाले, त्यांचे नौदल नष्ट झाले आहे, हवाई दल नष्ट झाले आहे. त्यांचे ड्रोन कारखाने सुमारे ८२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यांच्या क्षेपणास्त्र उत्पादनावरही फटका बसला असून क्षेपणास्त्र कारखाने जवळपास ९० टक्क्यांनी उद्ध्वस्त झाले आहेत.

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Baramati : शारीरिक संबंधांसाठी दबाव अन् 'त्या' गोळ्यांचा डोस; MPSC करणाऱ्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल