इराण झुकणार नाही; इराण-इस्रायलचे परस्परांवर हल्ले चालूच  संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

Iran Israel War : इराण झुकणार नाही; इराण-इस्रायलचे परस्परांवर हल्ले चालूच

शेजारी देशांवर केलेल्या हल्ल्यांबाबत माफी मागण्याच्या आपल्या वक्तव्यावरून इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी घूमजाव केले आहे. कोणत्याही देशामधून हल्ला झाला, तर तेहरान त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात रविवारी त्यांनी एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला.

Swapnil S

तेहरान : शेजारी देशांवर केलेल्या हल्ल्यांबाबत माफी मागण्याच्या आपल्या वक्तव्यावरून इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी घूमजाव केले आहे. कोणत्याही देशामधून हल्ला झाला, तर तेहरान त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात रविवारी त्यांनी एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. माझ्या आधीच्या वक्तव्याचा आमच्या शत्रूंनी चुकीचा अर्थ लावला आहे, असा दावा करून पेझेश्कियान यांनी त्यात म्हटले आहे की, आमच्यावर हल्ला झाला, तर प्रत्युत्तर देण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. आमच्यावर जितका अधिक दबाव आणला जाईल, तितके आमचे प्रत्युत्तरही अधिक कठोर असेल. दादागिरी, अत्याचार किंवा आक्रमणासमोर इराण कधीही झुकणार नाही व तो कधीच झुकलेलाही नाही.

इराणचा ‘युरेनियम’जप्त करण्यासाठी जमिनी कारवाई

या संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणबाबत आणखी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून इराणचा युरेनियम साठा जप्त करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल या युद्धात विशेष सैन्य उतरवण्याची शक्यता आहे. या मोहिमेत अमेरिका इराणमध्ये जमिनीवर कारवाई करण्याची शक्यता असून यासाठी गुप्त तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेले युद्ध आतापर्यंत क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लढलं गेलं आहे. मात्र, आता जमिनीवर कारवाई करण्याची चर्चा वॉशिंग्टनमध्ये सुरू झाली आहे.

हल्ल्यांना इराणचेही प्रत्युत्तर

दरम्यान, अमेरिकी व इस्रायली सैन्यांचे इराणवर हल्ले सुरूच असून इराणनेही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा क्रम कायम आहे. इस्रायलने रविवारी तेहरानमध्ये आणखी एक हवाई हल्ला करुन इराणच्या अंतराळ संस्थेचे मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. हे मुख्यालय इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. इस्रायलच्या मते, या केंद्राचा वापर कडून दहशतवादी कारवायांसाठी तसेच इस्रायल आणि तेथील नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी केला जात होता, असे इस्रायलचे म्हणणे आहे.

अमेरिकेचे चार रडार केले नष्ट

या हल्ल्याला प्रत्त्युत्तर दिल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने केला आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या २४ तासांत अमेरिकेच्या थाड क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीशी संबंधित चार रडार त्यांनी अचूक क्षेपणास्त्रे डागून नष्ट केले आहेत. ही कारवाई अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण पायाभूत सुविधांना लक्ष्य करून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लेबनॉनमध्ये १५ जण ठार

लेबनॉनमध्ये विविध ठिकाणी शनिवारी रात्री इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात १५ जण ठार आणि १५ जण जखमी झाले. युद्धामुळे विस्थापित झालेल्या लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या बैरुतमधील एका हॉटेलवरील हल्ल्यात चार जण ठार झाले. तर, जबल अल-बातूम आणि काफर रुम्मन या शहरांमध्ये झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, इराण समर्थित हिजबुल्लाहने इस्रायला चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला. अल-मलिकिया लष्करी तळावर तसेच उत्तर इस्रायली शहर किर्यात शमोना येथे कामिकाझे ड्रोन हल्ल्याचा दावाही केला.

बहारिन, कुवेत, यूएईमध्ये स्फोटांच्या घटना

दरम्यान, बहारिन, कुवेत, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांमध्ये रविवारीही स्फोटांच्या घटना सुरूच राहिल्या. दुबईमधील लोकप्रिय दुबई मरिना परिसरात एका क्षेपणास्त्राच्या अवशेषांमुळे मोठ्या निवासी टॉवरला आग लागल्याची घटना घडली.

विमानसेवा पूर्ववत

आखातातील युद्धामुळे या प्रदेशात ठप्प झालेली आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक येत्या आठवड्यात पूर्ववत होईल अशी चिन्हे आहेत. एमिरेट्स, एथियाड आणि कतार एअरवेज यांसारख्या विमान कंपन्या हळूहळू त्यांच्या सेवा वाढवत असून भारत, अमेरिका व इंग्लंडकडे जाणारी विमाने पूर्वीप्रमाणे उडू लागतील अशी शक्यता आहे.

इराणमध्ये सैन्य?

इराणमधील अण्वस्त्र सामग्रीवर कबजा करण्यासाठी तेथे लष्करी तुकडी पाठवण्याचा अमेरिकेचा विचार असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केले आहे. आतापर्यंत केवळ हवाई हल्ले करुन इराणला जेरीला आणल्यानंतर आता सैन्यदलाच्या काही तुकड्या त्या देशात पाठवण्याचा विचार केला जाऊ शकतो असे ट्रम्प यांनी एनबीसी वाहिनीशी बोलताना सांगितले.

लेबॉननकडून निषेध

याचवेळी लेबनॉनचे परराष्ट्र मंत्री यूसुफ राजी यांनी अनेक अरब देशांवर झालेल्या इराणी हल्ल्यांचा निषेध केला आहे. त्यांनी अरब लीगच्या बैठकीत बोलताना सांगितले की, हेझबुल्लाच्या लष्करी कारवायांना लेबनॉन सरकार पाठिंबा देत नाही. हेझबुल्लाने तातडीने आपली शस्त्रे समर्पित करावीत, अशी मागणीही पुन्हा केली.

तेहरानमध्ये अंधार

इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे अनेक इंधन साठवण केंद्रांमध्ये लागलेल्या आगीमधून उठलेल्या दाट काळ्या धुराने तेहरानमध्ये सूर्यप्रकाश पोचणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे आज सकाळी बराच काळ तेथे काळोख दाटला होता. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये तेहरानमधील पाच प्रमुख इंधन साठवण केंद्रांना लक्ष्य करण्यात आले.

इराणच्या नॅशनल इराणी ऑइल प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये दोन टँकर चालकांसह काही जणांचा मृत्यू झाला. तेहरानवरील हल्ले चालूच असून रात्रीच्या आकाशात मोठमोठे अग्निगोळे उसळताना दिसत आहेत, तर दाट धुराचे लांब स्तंभ राजधानीच्या वर पसरलेले दिसतात. काही फुटेजमध्ये गळती झालेल्या इंधनाला आग लागल्यामुळे रस्त्यांवरून ज्वाळा पसरताना देखील दिसत आहे.

इराणचा पराभव अटळ : ट्रम्प

यापूर्वी शनिवारी प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये पेझेश्कियान यांनी शेजारी देशांवरील हल्ल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. या देशांमधून इराणवर हल्ले झाले नाहीत, तर इराणही असे हल्ले करणार नाही असे म्हटले होते. त्यावर सध्या सुरू असलेल्या युद्धात इराण जबरदस्त मार खात असून त्याचा पराभव अटळ आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन