तेहरान/तेल अवीव : इराणने जगभरातील पर्यटन स्थळांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे, तसेच आपली क्षेपणास्त्र निर्मिती अद्याप सुरूच असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांना शुक्रवारी इराणने हे सडेतोड उत्तर दिले.
मुस्लिम दिनदर्शिकेतील एका पवित्र दिवशी आणि पर्शियन नववर्ष म्हणजेच 'नवरोझ' साजरा होत असताना इराणने इस्त्रायल आणि शेजारील आखाती अरब देशांमधील ऊर्जा केंद्रांवर मारा केला. नवरोझ हा सण सहसा उत्साहात साजरा केला जातो, मात्र यावर्षी युद्धाच्या सावटाखाली तो अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे.
इराणमधून पुरेशी माहिती बाहेर येत नसल्यामुळे, २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून तेथील शस्त्रास्त्र, अणुशक्ती किंवा ऊर्जा प्रकल्पांचे नक्की किती नुकसान झाले आहे, किंवा देशाची खरी सूत्रे कोणाच्या हातात आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असूनही, इराणने हे दाखवून दिले आहे की ते अजूनही हल्ले करण्यास सक्षम आहेत. या हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे, ज्यामुळे मध्यपूर्वेच्या बाहेरही अन्नधान्य आणि इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.
इराणमधील सत्तापालट करण्यासाठी जनतेला प्रवृत्त करणे किंवा इराणचे अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम नष्ट करणे, अशी बदलती कारणे अमेरिका आणि इस्त्रायलकडून या युद्धासाठी दिली जात आहेत. मात्र, इराणमध्ये अशा कोणत्याही जनक्षोभाची सार्वजनिक चिन्हे दिसत नसून, हे युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.
ट्रम्प यांची 'नाटो' राष्ट्रांवर टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'नाटो' राष्ट्रांची 'भित्रे' अशी संभावना करीत ही राष्ट्र अमेरिकेशिवाय 'कागदी वाघ' असल्याची टीका केली. तसेच इराणविरुद्धच्या युद्धात 'नाटो' राष्ट्रांनी मदत न केल्याची बाब लक्षात ठेवू, अशी धमकीही त्यांनी दिली.
इराणचा रियाधवर हल्ला, भारतीय नागरिकाचा मृत्यू
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान रियाधवर झालेल्या इराणी हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तीन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत एकूण सहा भारतीयांचा बळी गेला आहे. बुधवारी रियाधवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती थेट क्षेपणास्त्र हल्ल्याची बळी ठरली की पाडलेल्या क्षेपणास्त्राच्या अवशेषांमुळे तिचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी १३ मार्च रोजी ओमानमधील सोहार शहरात झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन भारतीय नागरिक ठार झाले होते, तर १० जण जखमी झाले होते. तसेच, व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता.