Photo : X (@B7frankH)
आंतरराष्ट्रीय

गाझा शहरात इस्रायलचे जमिनीवरून हल्ले सुरू

इस्रायली सैन्याने मंगळवारी गाझा शहरातील ‘हमास’च्या लष्करी तळांचा नाश करण्यासाठी जमिनीवरील कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे गाझातील रहिवाशांनी जीवाच्या भीतीने पलायन करायला सुरुवात केली आहे.

Swapnil S

जेरुसलेम : इस्रायली सैन्याने मंगळवारी गाझा शहरातील ‘हमास’च्या लष्करी तळांचा नाश करण्यासाठी जमिनीवरील कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे गाझातील रहिवाशांनी जीवाच्या भीतीने पलायन करायला सुरुवात केली आहे.

इस्रायली सैन्याचे प्रवक्ते अविचाय अद्राई यांनी ही घोषणा केली. यापूर्वी संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी "गाझा जळत आहे" असे सांगितले होते. या घोषणेमुळे इस्रायल-हमास युद्ध आणखी तीव्र झाले असून युद्धविरामाची शक्यता धुसर झाली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो इस्रायलचा दौरा संपवून कतारमध्ये पोहोचले. तेथे ते कतारच्या अमिरांची भेट घेणार आहेत. गेल्या आठवड्यातील इस्रायलच्या हल्ल्यात ‘हमास’चे पाच नेते आणि स्थानिक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याने कतार संतप्त आहे.

अरब व मुस्लिम राष्ट्रांनी सोमवारी शिखर परिषदेच्या वेळी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला, मात्र इस्रायलविरोधात ठोस कारवाई टाळली.

त्यामुळे इस्रायलवर मुत्सद्देगिरीद्वारे दबाव आणणे किती कठीण आहे, हे स्पष्ट झाले. तरीही इजिप्तने आपली भाषा अधिक तीव्र करत मंगळवारी अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच इस्रायलला ‘शत्रू’ म्हटले.

इस्रायल सोडण्यापूर्वी रुबियो यांनी पत्रकारांशी बोलताना गाझा शहरावरील हल्ल्याला सुरुवात झाल्याचे संकेत दिले. आमच्याकडे करारासाठी फार कमी वेळ आहे. फक्त काही दिवस किंवा काही आठवडे आहेत. हा निर्णायक क्षण आहे. वाटाघाटीद्वारे संघर्ष संपण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, सैन्य कारवाई वाढल्यामुळे गाझासाठी धोके अधिक आहेत, असे त्यांनी कबूल केले.

इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, ‘गाझा जळत आहे. दहशतवादी तळांवर हल्ला होत आहे. सैनिक बंदिवानांच्या सुटकेसाठी व हमासच्या पराभवासाठी शौर्याने लढत आहेत. मिशन पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही.’

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, गेल्या महिन्यात उत्तरेकडील गाझा प्रदेशातून २.२ लाखांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांनी पलायन केले आहे. हल्ल्यापूर्वी या भागात अंदाजे १० लाख पॅलेस्टिनी राहत होते.

गाझा शहरात किमान २० ठार

गाझा शहरात मंगळवारी सकाळी जोरदार हल्ले झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. शिफा रुग्णालयाने पश्चिमेकडील वस्तीत झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या २० जणांचे मृतदेह स्वीकारले, तर ९० जखमी झाले आहेत. गाझामध्ये अत्यंत कठीण रात्र होती. बॉम्बहल्ले एका क्षणासाठीही थांबले नाहीत, असे रुग्णालय संचालक डॉ. मोहम्मद अबू सलमीयाह यांनी सांगितले.

गाझामध्ये अजूनही बंदिवान असलेल्या इस्रायलींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. काहींनी तंबू टाकून रात्रभर ठाण मांडले. या देशाने जागे व्हावे, माझ्या मुलाला व इतर ४७ बंदिवानांना जिवंत किंवा मृत परत आणावे, अशी आर्त हाक ऐनाव झांगोकर यांनी दिली. इस्रायलच्या मते, ४८ पैकी २० अपहृत जिवंत आहेत. ‘हमास’ने मात्र स्पष्ट केले की, ते अपहृतांची सुटका फक्त पॅलेस्टिनी कैद्यांची अदलाबदल, कायमस्वरूपी युद्धविराम व इस्रायलची माघार याच्या बदल्यातच करतील.

इस्रायलविरोधात इजिप्तची कडक भूमिका

इस्रायलसोबत १९७९ पासून शांतता करार असलेल्या इजिप्तनेही यावेळी कडक भाषा वापरली. कतारमधील शिखर परिषदेत अध्यक्ष अब्देल-फत्ताह अल-सिसी यांनी इस्रायलला ‘शत्रू’ संबोधले. इजिप्त सरकारच्या मते, अनेक दशकांत प्रथमच अशा भाषेचा वापर झाला आहे. तथापि, इजिप्तने अजून औपचारिक पावले उचललेली नाहीत, मात्र इस्रायलच्या कारवायांविषयी आपली भूमिका गंभीर असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

मुंबईकरांचे झोपेचे गणित बिघडले, मिळत नाही आठ तासांचीही झोप; शहरी जीवनशैलीचा दुष्परिणाम

दहावी-बारावी परीक्षेत 'मास कॉपी'चे प्राबल्य; १०३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे; निलंबनाची कारवाई

Mumbai : ५ वर्षांनंतर 'वनराणी' पुन्हा रुळावर; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai : महापौरांचा VIP थाट कायम! मोटारीवर लखलखणार दिवे

२४ अनधिकृत नर्सिंग होम्सवर कारवाईचा बडगा; जन्म नोंदणी फॉर्म देणे बंद; बनावट प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर BMC चा कठोर पवित्रा