आंतरराष्ट्रीय

गाझात बफर झोन करण्याची इस्रायलची योजना - इस्रायलची इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबियाला माहिती

नवशक्ती Web Desk

तेल अवीव : युद्धानंतर गाझा पट्टीत बफर झोन तयार करण्याची योजना असल्याचे इस्रायलने शेजारी अरब देशांना कळवले आहे. इस्रायलने इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाला ही माहिती दिली आहे.

आठवड्याभराच्या युद्धविरामानंतर इस्रायलने गाझा पट्टीवरील हल्ले पुन्हा नव्या जोमाने सुरू केले आहेत. आता हल्ल्यांचा रोख प्रामुख्याने गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील प्रदेशावर आहे. तेथील खान युनूस शहरावर इस्रायली सेनादलांनी जोरदार हल्ले चढवले आहेत. तेथील नागरिकांना स्थलांतर करण्याची संधी देण्यात यावी, अशी ताकीद अमेरिकेसह मित्रदेशांनी इस्रायलला दिली होती. तरीही तेथील सामान्य नागरिकांच्या मृत्यूंच्या संख्येत भर पडली आहे. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरून चिंता व्यक्त होत आहे.

हमासबहोबरील युद्ध थांबल्यानंतर गाझा पट्टीचे भवितव्य काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. इस्रायल गाझा पट्टीत अनिश्चित काळासाठी संरक्षणाची जबाबदारी पार पाडेल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र, त्याचा नेमका अर्थ स्पष्ट झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर या वृत्ताला महत्त्व आहे. युद्धानंतर गाझा पट्टीत बफर झोन तयार केला जाईल, जेणेकरून तेथून भविष्यात पुन्हा कधीही हल्ले होऊ शकणार नाहीत, असे इस्रायलने अरब देशांना कळवले आहे.

इस्रायलने इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती या देशांबरोबर २०२० साली राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. या देशांना इस्रायलने भविष्यातील योजनेची कल्पना दिली आहे. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने सौदी अरेबियाबरोबरही संबंध सुधारण्याचे प्रयत्न चालवले होते. पण हमासच्या हल्ल्यानंतर ते प्रयत्न तांबले. तरीही बफर झोनसंबंधी माहिती इस्रायलने सौदी अरेबियालाही दिली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस