आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानात ‘जाफर एक्स्प्रेस’चे अपहरण; ‘बीएलए’ने शेकडो प्रवाशांना ठेवले ओलीस; चकमकीत २० पाक सैनिक ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) ‘जाफर एक्स्प्रेस’ ही रेल्वेगाडी हायजॅक केली आहे.

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) ‘जाफर एक्स्प्रेस’ ही रेल्वेगाडी हायजॅक केली आहे. या गाडीतील १८२ प्रवाशांना ‘बीएलए’ने ओलीस ठेवले असून, चकमकीत २० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा ‘बीएलए’ने केला आहे. याशिवाय एक ड्रोनही पाडण्यात आले आहे. पाकिस्तानचे सैन्य ओलिसांची सुटका करण्याचे प्रयत्न करीत असून, यासाठी गरज पडल्यास ‘एअर स्ट्राईक’ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांनी रेल्वेगाडीवर बेछूट गोळीबार केल्याने अनेक प्रवासी जखमी झाल्याचे एका वृत्तसंस्थेच्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

ट्रेन हायजॅक केल्यानंतर ‘बीएलए’ने शाहबाज सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. ‘आमच्याविरोधात लष्करी कारवाई केल्यास सगळ्या ओलिसांना ठार करु’, अशी थेट धमकी ‘बीएलए’कडून देण्यात आली आहे. जाफर एक्स्प्रेसचे अपहरण होऊन काही तास उलटले आहेत. परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे पाक सरकारची चिंता वाढली आहे.

...तर ओलिसांना ठार करू!

पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तुनख्वामधील पेशावरकडे ‘जाफर एक्स्प्रेस’ जात असताना ही घटना घडली. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला, तर सर्व ओलिसांना ठार मारू आणि या मृत्यूची जबाबदारी संपूर्णपणे लष्करावर राहील, अशी धमकीही देण्यात आली आहे.

ट्रॅक उडवून ट्रेन थांबवली

‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने एक निवेदन जारी करून म्हटले की, मशकाफ, धादर आणि बोलानमध्ये रेल्वेगाडीचे अपहरण करण्यात आले आहे. आमच्या सैनिकांनी आधी रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवून दिला, त्यानंतर गाडी थांबताच अपहरण केले.

बलुच लिबरेशन आर्मीने सांगितले की, हे ऑपरेशन मजीद ब्रिगेड, एसटीओएस आणि फतेह पथकाने संयुक्तपणे केले आहे. ‘बीएलए’चे प्रवक्ते जिआंद बलोच याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने टेहळणीसाठी पाठवली आहेत.

‘बीएलए’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

बलुचिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील माच शहराच्या अब-ए-गमजवळ गाडीवर हल्ला करण्यात आला. ‘बीएलए’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘बीएलए’वर पाकिस्तान, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

गाडीचालक गंभीर जखमी

या घटनेचे वृत्त कळताच मदत आणि सुरक्षा पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली असून हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी कारवाई सुरू आहे. हल्ल्यात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला असून आपत्कालीन मदत गाडीही रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे नियंत्रक मोहम्मद काशीफ यांनी सांगितले की, जाफर एक्स्प्रेस नऊ डब्यांची गाडी असून, गाडीत जवळपास ५०० प्रवासी होते. सशस्त्र हल्लेखोरांनी बोगदा क्रमांक ८ मध्ये गाडी थांबविली, असेही ते म्हणाले.

बलुच संघटनांची स्वातंत्र्याची मागणी

बलुचिस्तान हा संसाधनांनी समृद्ध असलेला प्रांत आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून तिथे संघर्ष सुरू आहे. स्वातंत्र्य आणि अधिक स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी संघटनांकडून दीर्घ काळापासून येथे हिंसाचार सुरू आहे. अलीकडच्या काही वर्षांत या प्रदेशात सुरक्षा दलांवर, पायाभूत सुविधांवर आणि नागरिकांवर वारंवार हल्ले झाले आहेत.

नोव्हेंबरमध्ये स्फोटात २६ ठार, ६२ जखमी

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, पाकिस्तान रेल्वेने क्वेट्टा आणि पेशावर दरम्यानची रेल्वे सेवा दीड महिन्याहून अधिक काळ खंडित केल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षभरात बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये, क्वेट्टा रेल्वे स्थानकावर झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान २६ जण ठार आणि ६२ जण जखमी झाले होते.

ओलिसांमध्ये आयएसआय, पोलीस व लष्करी जवान

ओलीस ठेवलेल्या प्रवाशांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवादविरोधी दल आणि ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस’चे (आयएसआय) कर्मचारी आहेत. हे सर्वजण रजेवर असून सुटीसाठी ते पंजाबला निघाले होते. याची माहिती मिळाल्याने ‘बीएलए’ने या गाडीचे अपहरण केल्याचे सांगण्यात येते. कारवाई केल्यास सर्व ओलिसांना ठार मारू, असा इशारा ‘बीएलए’ने दिला आहे.

ओलिसांच्या सुटकेसाठी एअर स्ट्राईक करण्याची तयारी

दरम्यान, परिस्थिती बिघडत चालल्याने पाकिस्तानच्या सैन्याने रणनीती बदलली आहे. आधी लष्कराने परिस्थिती सांभाळली होती. पण त्यांना कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. त्यामुळे लष्कराला मागे हटावे लागले. त्यानंतर आता पाकिस्तानने एअर स्ट्राईकची मदत घेतली आहे. हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांवर हवाई हल्ले करून ओलिसांची सुटका करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

Mumbai : ४०० टन वजनी क्रेन उलटली; BKC मध्ये मेट्रो कामादरम्यान मोठा अपघात

पुण्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढले; सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपये लुटले

"मुलगा माझ्यासारखा दिसत नाही..."; पत्नीवरील संशयामुळे पित्यानेच घेतला सहा वर्षीय मुलाचा जीव; चौकशीत धक्कादायक खुलासा

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी