आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांची अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांसह भेट - संरक्षण, अंतराळ, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत

नवशक्ती Web Desk

वॉशिंग्टन : अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये संरक्षण, अंतराळ संशोधन आणि पर्यावरणपूरक ऊर्जा आदी क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर त्यांच्यात चर्चा झाली.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी यापूर्वी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सहभाग घेतला आणि अनेक देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. शुक्रवारी जयशंकर न्यूयॉर्कहून वॉशिंग्टनला आले. तेथे त्यांनी दिवसाची सुरुवात व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांच्या भेटीने केली. त्यानंतर ते अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या फॉगी बॉटम या कार्यालयात ब्लिंकेन यांना भेटले. ब्लिंकेन आणि जयशंकर यांच्या भेटीत भारताचे जी-२० अध्यक्षपद, भारत, मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरची निर्मिती, तसेच भारत आणि अमेरिकेतील आगामी टू प्लस टू चर्चा या विषयांवर चर्चा झाली. बैठकीत दोन्ही देशांत संरक्षण, अंतराळ संशोधन, पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मिती आदी विषयांवर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर दिला गेला.

भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या पातळीवरील टू प्लस टू चर्चेची पाचवी फेरी आगामी काळात नवी दिल्लीत होणार आहे. त्यात भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाग घेतील, तर अमेरिकेच्या वतीने परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन आणि संरक्षण मंत्री लॉइड जॉर्ज सहभागी होती. या भेटीच्या प्रत्यक्ष तारखा अद्याप ठरल्या नसल्या तरी त्याची पूर्वतयारी करण्याविषयी भेटीत चर्चा झाली.

जयशंकर आणि ब्लिंकेन यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भारत-कॅनडा बिघडलेल्या संबंधांवर प्रश्न विचारले. ब्लिंकेन यांनी त्यावर भाष्य करण्याचे टाळले.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे