मेक्सिको : जगातील वेगाने खचणाऱ्या शहरांपैकी एक आणि सुमारे २.२ कोटी लोकसंख्या असलेली मेक्सिको सिटी हळूहळू भूगर्भात खचत आहे. जुन्या सरोवराच्या गाळावर वसलेल्या या शहराची जमीन दरवर्षी सुमारे १० इंचांपर्यंत खचत आहे. भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या 'निसार' या उपग्रहाद्वारे या गंभीर संकटाचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यात येत आहे.
ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यानच्या 'निसार'च्या प्राथमिक विश्लेषणातून समोर आले आहे की, शहराचा काही भाग दरमहा अर्ध्या इंचापेक्षा जास्त खचत आहे. जमिनीखालील पाण्याचा अमर्याद उपसा आणि वाढत्या शहरीकरणाच्या वजनामुळे शतकाहून अधिक काळ जुन्या सरोवराचा गाळ आकसला जात आहे. या समस्येमुळे रस्ते, इमारती, मेट्रो, ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांना मोठे तडे जात आहेत. परिणामी, अनेक ऐतिहासिक स्मारके एका बाजूला झुकल्याचे दिसून येत आहे.