आंतरराष्ट्रीय

"घाण नका करू... हे भारत नाहीये"; नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना सुनावलं; गुटखा थुंकल्यानंतर रस्ता साफ करून घेतला, Video व्हायरल

नेपाळमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चालत्या गाडीतून गुटखा थुंकणाऱ्या भारतीय पर्यटकांना स्थानिक नागरिकाने थांबवत जाब विचारला आणि त्यांच्याकडूनच रस्ता स्वच्छ करून घेतला.

Mayuri Gawade

परदेशात फिरायला गेलेल्या काही भारतीय पर्यटकांच्या वर्तनामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकत्वाच्या जाणिवेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नेपाळमध्ये घडलेल्या एका घटनेत, रस्त्यावर गुटखा थुंकणाऱ्या भारतीय पर्यटकांना स्थानिक नागरिकाने थेट जाब विचारत, त्यांच्याकडूनच ती घाण साफ करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

"हे भारत नाही, नेपाळ आहे… इथे अशी घाण करू नका"

या व्हिडिओच्या पार्श्वभूमीबाबत सांगितलं जात आहे की, काही भारतीय पर्यटक नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले होते. ते कारने जात असताना, त्यापैकी एका व्यक्तीने चालत्या गाडीतून रस्त्यावर गुटखा थुंकल्याचं दिसतं. हा प्रकार लक्षात येताच तेथील एका स्थानिक नागरिकाने तत्काळ गाडी अडवून त्यांना जाब विचारला.

“हे भारत नाही, नेपाळ आहे… इथे अशी घाण करू नका. तुम्ही इतक्या मोठ्या देशातून येता आणि इथे येऊन असं घाण करता", अशा शब्दांत त्या नागरिकाने संताप व्यक्त केला. केवळ बोलून न थांबता, त्याने संबंधित व्यक्तीकडून रस्त्यावर पडलेली घाण पाण्याने धुवून घेतली. दरम्यान त्याचा सूर आक्रमक नसून ठाम आणि स्पष्ट होता.

त्यानंतर संबंधित पर्यटकाने माफी मागत पाण्याने गुटख्याचे डाग स्वतः साफ केले. दरम्यान, स्थानिक नागरिकाने सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करत त्यांना नियम पाळण्याचा सल्ला दिला.

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

हा व्हिडिओ समोर येताच नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेकांनी नेपाळी नागरिकाच्या शांत पण ठाम भूमिकेचं कौतुक केलं. "स्वतःच्या देशाचा अभिमान बाळगणाऱ्या त्या व्यक्तीला सलाम. भारतातही अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांना जाब विचारणारे लोक हवेत,” अशी प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केली.

तर काहींनी भारतीय पर्यटकांच्या वर्तनावर टीका करत कठोर मत व्यक्त केलं. “रस्त्यावर गुटखा थुंकणं ही घाणेरडी सवय आहे. यामुळे इतर देशांमध्ये भारतीयांविषयी चुकीची प्रतिमा तयार होते,” असंही काहींनी नमूद केलं.

व्हायरल व्हिडिओ पाहा

नागरिकांच्या वर्तनावर पुन्हा चर्चा

या घटनेनंतर सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांच्या जबाबदारीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. विशेषतः परदेशात जाताना स्थानिक नियम, संस्कृती आणि स्वच्छतेच्या निकषांचा आदर करणं किती महत्त्वाचं आहे, यावर भर दिला जात आहे.

हा व्हिडिओ एक साधा प्रसंग असला, तरी तो प्रत्येकाला एक महत्त्वाचा संदेश देतो—आपलं वर्तन केवळ आपल्यापुरतं मर्यादित नसतं, तर त्यातून आपल्या देशाची प्रतिमा घडत असते. त्यामुळे देशात असो किंवा परदेशात, सार्वजनिक ठिकाणांचा आदर राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Mumbai : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; काही विद्यार्थी जखमी, बचावकार्य सुरू, Video

आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स

सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल