आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत एक्स गर्लफ्रेंडची हत्या; भारतात पळून आलेल्या अर्जुन शर्माला तामिळनाडूमधून अटक

इंटरपोलच्या नेतृत्वाखालील एका व्यापक आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेची सोमवारी तामिळनाडूमध्ये २६ वर्षीय अर्जुन शर्माच्या अटकेने सांगता झाली.

Krantee V. Kale

इंटरपोलच्या नेतृत्वाखालील एका व्यापक आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेची सोमवारी तामिळनाडूमध्ये २६ वर्षीय अर्जुन शर्माच्या अटकेने सांगता झाली. अमेरिकेत भारतीय वंशाची तरुणी निकिता राव गोधीशाला (वय २७) ही बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केल्यानंतर अर्जुन अमेरिकेतून थेट भारतात पळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता तिचा मृतदेह अमेरिकेतील मॅरिलँड येथे अर्जुन शर्मा याच्याच घरात आढळून आला.

माध्यमांच्या माहितीनुसार, विविध यंत्रणांमधील सातत्यपूर्ण पाळत आणि माहितीच्या देवाणघेवाणीच्या आधारे इंटरपोलने संबंधित आरोपीला तामिळनाडूमध्ये अटक केली. २६ वर्षीय शर्माने ज्या दिवशी निकीता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, त्याच दिवशी तो अमेरिकेतून भारतासाठी रवाना झाला होता. त्याला सोमवारी अटक करण्यात आली असून, अटकेबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

निकिता गोधीशाला ही ३१ डिसेंबरपासून बेपत्ता होती. तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा (वय २६) याने २ जानेवारी रोजी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, ही तक्रार नोंदवल्यानंतर त्याच दिवशी अर्जुन शर्मा भारतात फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी ३ जानेवारी रोजी अर्जुन शर्माच्या मॅरिलँड येथील फ्लॅटची झडती घेतली असता, तिथे निकिताचा मृतदेह आढळून आला. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजल्यानंतर तिची हत्या झाल्याचा अंदाज तपासकर्त्या पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. तो भारतात पळाल्याचं समजल्यानंतर अमेरिकेतील पोलिसांनी भारतीय तपास यंत्रणांशी संपर्क साधला होता.

भारतीय दूतावास कुटुंबाच्या संपर्कात

या घटनेनंतर वॉशिंग्टन डी.सी. येथील भारतीय दूतावास निकिताच्या कुटुंबीयांशी संपर्कात आहे. दूतावासाकडून कुटुंबाला आवश्यक ती मदत पुरवली जात असून, अमेरिकेतील पोलिसांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. दरम्यान, ही हत्या नेमकी का झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी सध्या पोलीस तपास करत असून, या घटनेबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन अमेरिकन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

"My camera roll got full!"... शेवटची इंस्टाग्राम पोस्ट ठरली भावनिक

हत्येच्या तपासादरम्यान, सर्वांचे लक्ष निकिताच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टकडे गेले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या शेवटच्या पोस्टमध्ये तिने जिममधील फोटो, मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि वाढदिवस साजरा करतानाचे फोटो शेअर केले होते. या सगळ्या फोटो डंपला तिने दिलेली कॅप्शन होती - "My camera roll got full!" म्हणजेच "माझ्या कॅमेऱ्याचा रोल पूर्ण भरून गेला". त्या वेळी कॅप्शनमधील हे वाक्य कदाचित साधं, हलकंफुलकं वाटलं असावं, पण आज तिच्या मृत्यूनंतर ही साधी वाटणारी ओळ तिच्या आयुष्याशी नकळत जोडलेली असल्याची भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.

मतमोजणीच्या दिवशी बिनविरोध उमेदवारांची घोषणा; राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची माहिती

सुनील गावस्करांची वचनपूर्ती! जेमिमा रोड्रिग्सला खास गिफ्ट; गाणंही गायलं, पाहा Video

मुंबई लोकल आणि शिस्त? बदलापूरचा व्हायरल Video पाहून नेटकरी म्हणाले, 'हे खरं आहे की AI?'

Mumbai : आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र पाहणाऱ्या आजी-आजोबांचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, "तिच्या आवडत्या हिरोसोबत...

हीच खरी श्रीमंती! स्वतः बेघर, तरीही थंडीत कुडकुडणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप, पठाणकोटच्या राजूची सोशल मीडियावर चर्चा