स्को/कीव्ह : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान असलेल्या निवासस्थानावर युक्रेनने ९१ ड्रोन हल्ले केल्याचा खळबळजनक दावा रशियाने सोमवारी रात्री केला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी ही माहिती दिली असून, या हल्ल्यानंतर रशियाने आता युक्रेनच्या प्रमुख ठिकाणांवर हल्ले करणार असल्याचे स्पष्ट केल्याने शांतता प्रक्रियेला मोठी खीळ बसणार आहे.
लावरोव्ह यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, २८ आणि २९ डिसेंबरच्या दरम्यान युक्रेनने ९१ लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे नोव्हगोरोड प्रदेशातील पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानाला लक्ष्य केले. मात्र, रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व ड्रोन पाडले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे रशियाने म्हटले आहे. लावरोव्ह पुढे म्हणाले की, या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी रशियाने युक्रेनमधील काही लक्ष्य निश्चित केले असून, लवकरच तिथे प्रतिहल्ला केला जाईल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी फोनवर सकारात्मक चर्चा केल्याचे बोलले जात असतानाच हा हल्ला झाला आहे. ट्रम्प यांनी ही चर्चा फलदायी असल्याचे म्हटले होते. मात्र, एका बाजूला ट्रम्प यांच्याशी शांततेच्या गप्पा मारणे आणि दुसऱ्या बाजूला युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले करून नागरिक व पायाभूत सुविधा नष्ट करणे, असा रशियाचा दुटप्पी चेहरा असल्याची टीका झेलेन्स्की यांनी केली आहे. पुतिन यांनी अलीकडेच दावा केला होता की, रशिया डॉनबास, झापोरिझिया आणि खेरसन प्रदेशांच्या मुक्ततेसाठी आपल्या योजनेनुसार यशस्वीपणे पुढे जात आहे.
मोदींची प्रतिक्रिया
पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याच्या बातमीने जगभरात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. पुतिन यांच्या कायमस्वरूपी निवासस्थानावरील हल्ल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. रशियन फेडरेशनच्या अध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या वृत्तांमुळे मला खूप चिंता वाटली. शत्रुत्व संपवण्याचा आणि शांतता प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सतत राजनैतिक प्रयत्न करणे हाच आहे. आम्ही सर्व संबंधितांना या प्रयत्नांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आणि त्यांना कमजोर करणारी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन करतो, असे मोदी यांनी म्हटले आहे.
ट्रम्प संतप्त
डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे पत्रकारांना सांगितले की, आज सकाळी स्वतः पुतिन यांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितले की त्यांच्या घरावर हल्ला झाला आहे. हे अजिबात चांगले नाही. युद्धाच्या मैदानात लढणे एक गोष्ट आहे, पण थेट राष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला करणे ही वेगळी गोष्ट आहे. मी या घटनेमुळे खूप संतप्त आहे. ट्रम्प यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, ही वेळ अशा प्रकारच्या हल्ल्यांची नाही, कारण आपण शांतता कराराच्या अगदी जवळ आहोत.
युक्रेनने आरोप फेटाळले
दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रशिया शांतता प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी आणि युक्रेनवर मोठे हल्ले करण्यासाठी हा बनाव रचत आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.