३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर
३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर

३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही वर्षांत ३१ डिसेंबरला हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससोबतच घरच्या-घरी सेलिब्रेशन करण्याचा ट्रेंड वाढला आहे. डिलिव्हरी अॅप्समुळे पार्टीसाठी लागणाऱ्या वस्तू, जेवण, केक आणि ग्रोसरी काही मिनिटांत घरी पोहोचतात. मात्र, याच दिवशी पुकारण्यात आलेल्या संपामुळे या सेवांमध्ये उशीर होण्याची किंवा सेवा रद्द होण्याची शक्यता आहे.
Published on

नववर्षाच्या स्वागतासाठी आज ३१ डिसेंबरला संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. पार्टी, सेलिब्रेशन, घरी जेवण मागवण्याची लगबग सुरू असतानाच, या जल्लोषात थोडा व्यत्यय आणणारी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वर्षातील सर्वात व्यस्त असलेल्या ३१ डिसेंबरच्या दिवशीच झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या डिलिव्हरी अॅप्सवर काम करणारे गिग आणि डिलिव्हरी कामगार आज देशव्यापी संपावर गेले आहेत. त्यामुळे आज फूड डिलिव्हरी, ग्रोसरी ऑर्डर आणि शेवटच्या क्षणी होणारी ऑनलाईन शॉपिंग उशिरा होण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांत ३१ डिसेंबरला हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससोबतच घरच्या-घरी सेलिब्रेशन करण्याचा ट्रेंड वाढला आहे. डिलिव्हरी ॲप्समुळे पार्टीसाठी लागणाऱ्या वस्तू, जेवण, केक आणि ग्रोसरी काही मिनिटांत घरी पोहोचते. त्यामुळे ३१ डिसेंबर हा दिवस डिलिव्हरी व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र याच दिवशी पुकारण्यात आलेल्या संपामुळे अन्न वितरण, क्विक कॉमर्स आणि ई-कॉमर्स सेवा अनेक शहरांमध्ये विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा संप तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स (IFAT) यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आला आहे.

संपामागची कारणे काय?

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार कामगार संघटनांचा आरोप आहे की, ॲप-आधारित व्यवसायाचा कणा असलेल्या डिलिव्हरी कामगारांची कमाई सातत्याने घटत आहे, मात्र त्यांच्याकडून अधिकाधिक तास काम करून घेतले जात आहे. अवास्तव आणि असुरक्षित डिलिव्हरी टार्गेट्स, नोकरीची कोणतीही हमी नसणे, कामाच्या ठिकाणी सन्मानाचा अभाव आणि आरोग्य विमा, अपघात विमा, पेन्शन यांसारख्या मूलभूत सामाजिक सुरक्षेचा अभाव या समस्यांना कामगारांना रोज सामोरं जावं लागत आहे.

IFAT ने केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांना पाठवलेल्या पत्रात सांगितले आहे की, देशभरातील सुमारे ४ लाख ॲप-आधारित वाहतूक आणि डिलिव्हरी कामगारांचे ते प्रतिनिधित्व करतात. संघटनेने याआधी २५ डिसेंबरलाही देशव्यापी फ्लॅश संप केला होता, ज्यामुळे अनेक शहरांमध्ये ५० ते ६० टक्के सेवा विस्कळीत झाल्या होत्या.

कामगार संघटनांचा आरोप आहे की, त्या संपानंतरही कंपन्यांनी कामगारांशी संवाद साधण्याऐवजी आयडी ब्लॉक करणे, अल्गोरिदमद्वारे दंडात्मक कारवाई आणि तृतीय-पक्ष एजन्सींच्या माध्यमातून आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे अखेर ३१ डिसेंबरला पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

कोणत्या शहरांवर होणार परिणाम?

दरम्यान, या संपाचा थेट फटका ग्राहकांबरोबरच किरकोळ विक्रेते आणि प्लॅटफॉर्म कंपन्यांनाही बसण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता यांसह अनेक मोठ्या आणि टियर-२ शहरांमध्ये आज डिलिव्हरी सेवा उशिरा मिळणे, ऑर्डर रद्द होणे किंवा मर्यादित स्वरूपात सुरू राहणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार, आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर डिलिव्हरी कामगार ॲप्सवरून लॉगआऊट राहणार असून कामाचा वेग मोठ्या प्रमाणात कमी केला जाणार आहे.

कामगार संघटनांनी सरकारकडे प्लॅटफॉर्म कंपन्यांना कामगार कायद्यांच्या कक्षेत आणणे, असुरक्षित फास्ट डिलिव्हरी मॉडेल्सवर बंदी, पारदर्शक वेतनप्रणाली, सामाजिक सुरक्षा आणि कामगारांच्या संघटन हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच सरकार, कंपन्या आणि कामगार संघटना यांच्यात त्रिपक्षीय चर्चा तातडीने घडवून आणावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in