आंतरराष्ट्रीय

नॉर्वे, आयर्लंड, स्पेनकडून पॅलेस्टीनला मान्यता; इस्रायलने राजदूत परत बोलावले

नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन यांनी बुधवारी स्वतंत्र पॅलेस्टीन देशाला मान्यता देणार असल्याचे जाहीर केले.

Swapnil S

तेल अवीव : नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन यांनी बुधवारी स्वतंत्र पॅलेस्टीन देशाला मान्यता देणार असल्याचे जाहीर केले. गाझामधील हमास आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी प्राधिकरण या दोघांनीही या मान्यतेचे स्वागत केले आहे. इस्रायलने या निर्णयाचा निषेध केला असून या देशांतून आपले राजदूत परत बोलावले आहेत. त्यामुळे गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेल्या हमास-इस्रायल संघर्षाला वेगळे वळण मिळाले आहे.

आयर्लंड, नॉर्वे आणि स्पेन यांनी बुधवारी जाहीर केले आहे की, ते २८ मे पासून पॅलेस्टिनी देशाला औपचारिकपणे मान्यता देतील. इतर दोन देशांशी समन्वय साधून नॉर्वेने बुधवारी सर्वप्रथम ही घोषणा केली. स्पेन आणि आयर्लंडने हा निर्णय इस्रायलच्या विरोधात किंवा हमासच्या बाजूने नसून शांततेच्या समर्थनार्थ असल्याचे म्हटले आहे.

नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांनी एका भाषणात सांगितले की, हे पाऊल म्हणजे मध्यपूर्वेत चिरस्थायी शांतता स्थापित करण्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टीन हे देश एकमेकांच्या शेजारी शांततेने अस्तित्वात असावेत अशीच आमची आशा आहे. त्यानंतर लगेचच आयर्लंड आणि स्पेननेही त्याचा पाठपुरावा केला. आज आम्ही पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांसाठी सुरक्षितता, सन्मान आणि आत्मनिर्णयाच्या समान अधिकारासाठी आमचे निःसंदिग्ध समर्थन स्पष्टपणे व्यक्त करतो, असे आयरिश परराष्ट्र मंत्री मायकेल मार्टिन म्हणाले. आयरिश पंतप्रधान सायमन हॅरिस यांनी नंतर स्पष्ट केले की, हमास म्हणजे पॅलेस्टिनी लोक नाहीत. पॅलेस्टीनला मान्यता देण्याचा आजचा निर्णय शांततापूर्ण भविष्य निर्माण करण्यासाठी घेण्यात आला आहे.स्पॅनिश पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी जाहीर केले की, हे पाऊल इस्रायलच्या किंवा ज्यूंच्या विरोधात नाही. हे पाऊल हमासच्या बाजूने नाही. ही मान्यता कोणाच्याही विरोधात नाही, ती शांतता आणि सहअस्तित्वाच्या बाजूने आहे.

इस्रायलची संतप्त प्रतिक्रिया

इस्त्रायलने त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि इशारा दिला की, या निर्णयाने पश्चिम आशियाच्या प्रदेशात अधिक अस्थिरता निर्माण होईल आणि तिन्ही देशांतील आपल्या राजदूतांना परत बोलावले जाईल. परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सांगितले की, ते तीनही देशांतील इस्रायली राजदूतांना त्वरित परतण्याचे आदेश देत आहेत. इस्रायल यावर शांतपणे बसणार नाही. याचे गंभीर परिणाम होतील. इस्रायलमधील तीन देशांच्या राजदूतांना पाचारण करून त्यांना ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या महिला इस्रायली सैनिकांच्या अपहरणाचा व्हिडिओ दाखवला जाईल.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी