मॉस्को : रशियाने भारताला सुखोई एसयू-५७ लढाऊ विमान, सुखोई एसयू-३५ जेट, हवेतून हवेत मारा करणारे आर-३७ क्षेपणास्त्र आणि एस-५०० हवाई संरक्षण यंत्रणा देण्याची ऑफर दिली आहे. भारताला या शस्त्रांची नितांत गरज असली तरी काही कारणांमुळे भारताने अद्याप रशियाकडून कोणतीही नवीन शस्त्रे खरेदी करण्यास सहमती दर्शवलेली नाही. मात्र, सध्याची भू-राजकीय परिस्थिती पाहता भारत लवकरच रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर 'ऑपरेशन सिंदूर 'द्वारे जोरदार हल्ले केले. त्यानंतर चार दिवस चाललेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात रशियाकडून खरेदी केलेल्या शस्त्रांनी भारताला खूप मदत केली. विशेषतः रशियाच्या एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणेने २५० किमीपेक्षा जास्त अंतरावर उडणाऱ्या पाकिस्तानी ए डब्ल्यूएसीएस (अवॅक्स) विमानाला पाडले.
क्रांतिकारी बदल
रशियन मीडिया स्पुटनिकशी बोलताना, सेंटर फॉर अॅनालिसिस ऑफ वर्ल्ड आर्म्स ट्रेडचे संचालक आणि रशियन नॅशनल डिफेन्स मासिकाचे मुख्य संपादक इगोर कोरोत्चेन्को म्हणाले की, रशियाचे प्रमुख स्टेल्थ विमान एसयू-५७, लांब पल्ल्याचे आर-३७ क्षेपणास्त्र आणि एस-५०० हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यासाठी क्रांतिकारी ठरू शकतात. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या अनेक नवीन रेजिमेंट खरेदी करण्याची शक्यता विचारात घेत आहे.
एस-५०० बद्दल दावा
एस-५०० पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र/अँटी-बैलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे, जी एस-४०० आणि ए-२३५ एबीएम क्षेपणास्त्र प्रणालींचे अपग्रेड व्हर्जन आहे. एस-५०० अल्माझ अँटी एअर डिफेन्स कन्सर्नने विकसित केले आहे. रशियाचा दावा आहे की, 'एस-५००' हे नवीनतम हायपरसॉनिक शस्त्रे रोखण्यास देखील सक्षम आहे. अशा क्षमतेची यशस्वी चाचणी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, सुखोई एसयू-५७ हे द्विन-इंजिन असलेले स्टेल्थ मल्टीरोल लढाऊ विमान आहे. रशियाने ते 'पीएके एफए' कार्यक्रमांतर्गत विकसित केले आहे. हे लढाऊ विमान हवाई लढाई तसेच जमीन आणि समुद्री हल्ले करण्यास सक्षम आहे.