रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी त्रिपक्षीय चर्चा सुरू X|
आंतरराष्ट्रीय

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी त्रिपक्षीय चर्चा सुरू

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्याच्या उद्देशाने अमेरिका, रशिया आणि युक्रेन यांच्यातील त्रिपक्षीय चर्चा मंगळवारी अबुधाबी येथे सुरू झाली. युक्रेनच्या शिष्टमंडळाचे प्रमुख रुस्तेम उमेरोव्ह यांनी याबाबत माहिती दिली.

Swapnil S

अबुधाबी : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्याच्या उद्देशाने अमेरिका, रशिया आणि युक्रेन यांच्यातील त्रिपक्षीय चर्चा मंगळवारी अबुधाबी येथे सुरू झाली. युक्रेनच्या शिष्टमंडळाचे प्रमुख रुस्तेम उमेरोव्ह यांनी याबाबत माहिती दिली.

‘युक्रेन, अमेरिका आणि रशिया यांचा समावेश असलेल्या त्रिपक्षीय चर्चेच्या स्वरूपात आम्ही पुढे आलो आहोत,’ असे उमेरोव्ह यांनी सोशल मीडियावर सांगितले. यापूर्वी युक्रेनच्या प्रतिनिधींनी नाटो आणि युरोपीय देशांच्या दूतांशी प्राथमिक चर्चा केली होती.

यंदाच्या सुरुवातीला तीन टप्प्यांतील वाटाघाटींनंतर अमेरिकेने मॉस्को आणि कीव्ह यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. अबुधाबी येथे दोन दिवस चालणाऱ्या या चर्चेत सुरक्षा हमींवर विशेष भर दिला जाणार आहे. फेब्रुवारीनंतर प्रथमच अशा प्रकारची बैठक होत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांनी ‘एक्स’वर म्हटले की, ते आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी वाटाघाटींच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वभौम, सुरक्षित आणि समृद्ध युक्रेनची निर्मिती तसेच युरोपमध्ये अधिक स्थिर सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे, हा या प्रयत्नांचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उमेरोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दिवसाची सुरुवात युक्रेनचे शिष्टमंडळ, अमेरिकेचे दूत आणि ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नाटो तसेच युरोपीय आयोगाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीने झाली. त्यानंतर युक्रेन, अमेरिका आणि रशिया यांच्यात त्रिपक्षीय चर्चा सुरू झाली. रशियाचे शिष्टमंडळही चर्चास्थळी दाखल झाल्याचे रशियाची सरकारी वृत्तसंस्था 'रिया नोवोस्ती'ने सांगितले.

युद्ध संपवण्यासाठी संभाव्य करारातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर रशिया आणि युक्रेन यांच्या भूमिकांमध्ये अद्याप मोठी तफावत आहे. हे युद्ध आता पाचव्या वर्षात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

युक्रेनने सैन्य मागे घ्यावे

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनने डोनेत्स्क, लुहान्स्क, झापोरिझ्झिया आणि खेरसॉन या चार प्रदेशांतून आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये रशियाने या चार प्रदेशांचे बेकायदेशीरपणे विलीनीकरण केले होते. मात्र, या प्रदेशांवर रशियाला अद्याप पूर्ण नियंत्रण मिळवता आलेले नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का

बारावीची ९, दहावीची १५ फेब्रुवारीपासून परीक्षा; CISCE बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुन्हा ५००, २००० रु.च्या नोटा बंद करा; आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी

कंत्राटी निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना आचारसंहिता लागू; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Mumbai : मालवणीत १६ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू; फटाक्यांच्या दुकानात आग अन् छत कोसळले