भारतावर तब्बल २५ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताला लक्ष्य करत आहेत. आता त्यांनी भारतासह रशियावर देखील थेट निशाणा साधलाय. भारत आणि रशियाच्या व्यापार संबंधांवर त्यांनी टीका केली आहे. तसेच, रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनाही लक्ष्य केले आहे.
दोघांनी त्यांची अर्थव्यवस्था बुडवली, तरी मला फरक पडत नाही
भारत-रशियाची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली असून दोघांनी मिळून आपली अर्थव्यवस्था बुडवली, तरी मला फरक पडत नाही, अशी सोशल मीडिया पोस्ट ट्रम्प यांनी लिहिली आहे. "भारत रशियासोबत काय करतो याची मला पर्वा नाही. दोघांनी मिळून आपली डबघाईस आलेली अर्थव्यवस्था बुडवली, तरी मला फरक पडत नाही. आम्ही भारतासोबत खूप कमी व्यापार केला आहे. त्यांचे टॅरिफ खूपच जास्त आहेत. जगात सर्वाधिक दरांपैकी एक. तसंच, रशिया आणि अमेरिका यांच्यातही जवळपास काहीच व्यापार होत नाही. ते असंच राहू दे", असे ट्रम्प म्हणाले आहेत.
शब्द जपून वापरा, ट्रम्प यांचा रशियाच्या माजी अध्यक्षांना इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियासोबत "अल्टीमेटम गेम" खेळत आहेत आणि अशा दृष्टिकोनामुळे युद्ध होऊ शकते, असा इशारा दोन दिवसांपूर्वीच रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी दिला होता. त्यावरून, मेदवेदेव स्वःतःला अजूनही राष्ट्राध्यक्ष समजत असून त्यांनी आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावं. ते खूप धोकादायक क्षेत्रात पाऊल टाकत आहेत, असा गंभीर इशाराही ट्रम्प यांनी दिलाय.
पाकिस्तानला गोंजारत भारतावर निशाणा
याआधी, भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी पाकिस्तानला गोंजारत भारताला डिवचण्याचाही प्रयत्न केला. "अमेरिकेने नुकताच पाकिस्तानसोबत एक करार पूर्ण केला आहे. या कराराअंतर्गत पाकिस्तानातील विशाल तेलसाठ्यांना विकसित करण्यासाठी पाकिस्तान आणि अमेरिका एकत्र काम करतील", असे ट्रम्प यांनी सांगितले. पुढे ट्रम्प यांनी, "या भागीदारीचं नेतृत्व कोणती तेल कंपनी करेल, हे ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोण जाणे, कदाचित ते भविष्यात भारताला तेल विकतील!" अशा आशयाची पोस्ट करीत भारताला मुद्दाम डिवचलं.
दरम्यान, अमेरिकेने लादलेल्या २५ टक्के आयात शुल्कामुळे अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय वस्तू तेथे महाग होणार असून त्याचा विपरित परिणाम भारताच्या व्यापारावर होणार आहे. अमेरिकेत तयार होणाऱ्या उत्पादनांना सहजपणे भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळावा यासाठी ट्रम्प सातत्याने भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतावर त्यांनी २५ टक्के आयात शुल्क लागू करण्याबाबत केलेली घोषणा त्या दबावतंत्राचाच एक भाग आहे. यापूर्वी दबावतंत्राचा भाग म्हणून चीनसह अन्य देशांवरही अमेरिकेने प्रचंड ‘टॅरिफ’ लादले होते. मात्र, नंतर ते मागे घेतले किंवा निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.