‘ओपेक’मधून UAE बाहेर; कच्च्या तेलाच्या जागतिक बाजाराला हादरा बसणार (Photo-@nyuad.nyu.edu)
आंतरराष्ट्रीय

‘ओपेक’मधून UAE बाहेर; कच्च्या तेलाच्या जागतिक बाजाराला हादरा बसणार

जगातील तेल बाजाराला हादरा देणारी घटना मंगळवारी घडली आहे. तेल निर्यातदार देशांच्या जागतिक संघटना ‘ओपेक’ आणि ‘ओपेक प्लस’मधून ‘संयुक्त अरब अमिराती’ने (यूएई) बाहेर पडण्याची घोषणा केली.

Swapnil S

अबुधाबी : जगातील तेल बाजाराला हादरा देणारी घटना मंगळवारी घडली आहे. तेल निर्यातदार देशांच्या जागतिक संघटना ‘ओपेक’ आणि ‘ओपेक प्लस’मधून ‘संयुक्त अरब अमिराती’ने (यूएई) बाहेर पडण्याची घोषणा केली. १ मे रोजीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

‘संयुक्त अरब अमिराती’ची अधिकृत वृत्तसंस्था ‘डब्ल्यूएएम’ने मंगळवारी या वृत्ताला दुजोरा दिला. जवळपास ६० वर्षांचे सदस्यत्व संपवण्याचा हा निर्णय ‘ओपेक’च्या इतिहासातील सर्वात प्रभावी मानला जात आहे. ‘यूएई’ हा या संघटनेतील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश असल्याने या निर्णयाचे जागतिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

इराणमधील युद्ध नवव्या आठवड्यात पोहोचले असताना आणि होर्मुझची सामुद्रधुनी प्रत्यक्षात बंद असल्याने कच्च्या तेलाचे दर प्रति पिंप ११० डॉलरच्या वर गेले आहेत. अशा नाजूक परिस्थितीत यूएईने ही घोषणा केली आहे. यूएई १९६७ मध्ये ‘ओपेक’मध्ये सामील झाला होता, परंतु उत्पादन कोट्यावरून सौदी अरेबियाशी त्यांचे अनेक वर्षांपासून मतभेद होते.

‘ओपेक प्लस’ करारानुसार, ‘संयुक्त अरब अमिराती’ला दिवसाला सुमारे ३० दशलक्ष पिंप तेल उत्पादनाची मर्यादा देण्यात आली होती, तर त्यांची क्षमता ४० दशलक्ष पिंपपेक्षा जास्त आहे. ‘अँडनॉक'ने २०२७ पर्यंत दिवसाला ५० दशलक्ष पिंप उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असून, हे उद्दिष्ट विद्यमान कोट्याशी जुळणारे नव्हते.

सौदी अरेबिया आणि ‘संयुक्त अरब अमिराती’ने यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये येमेन युद्धाने अधिक तणाव निर्माण केला. या वर्षाच्या सुरुवातीला सौदी दलाने ‘संयुक्त अरब अमिराती’शी संबंधित बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची खेप जप्त केल्याचा दावा केला होता, त्यानंतर मुकल्ला बंदरावर हवाई हल्ले करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ‘संयुक्त अरब अमिराती’ने ऊर्जामंत्री सुहैल अल-मझरौई यांनी पूर्वीच स्पष्ट केले की, तेलावर कायमस्वरूपी अवलंबून राहणे योग्य नाही. अबु धाबीने स्वतःला ‘ओईसीडी’ अर्थव्यवस्थांप्रमाणे विकसित करण्यास सुरुवात केली असून, अमेरिकेसोबत १०० अब्ज डॉलरचा स्वच्छ ऊर्जा भागीदारी करार आणि २०५० पर्यंत 'नेट-झिरो'चे उद्दिष्ट ठेवले आहे.

‘संयुक्त अरब अमिराती’ बाहेर पडल्यामुळे तत्काळ उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही, कारण होर्मुझ संकटामुळे बहुतांश उत्पादन सध्या बंद आहे. ‘ईआयए’च्या अंदाजानुसार, आखाती उत्पादकांनी एप्रिलमध्ये सुमारे ९.१ दशलक्ष पिंप उत्पादन बंद ठेवले आहे. मात्र, दीर्घकालीन विचार करता कतार, इक्वेडोर, इंडोनेशिया आणि अंगोला पाठोपाठ ‘संयुक्त अरब अमिराती’ने घेतलेला हा निर्णय ‘ओपेक’साठी मोठे आव्हान ठरणार आहे.

सौदी-रशियासमोर आव्हान

‘बेकर इन्स्टिट्यूट’ने यापूर्वीच इशारा दिला की, ‘संयुक्त अरब अमिराती’ने बाहेर पडणे हे कतारपेक्षाही अधिक प्रभावी असेल. सौदी अरेबिया आणि रशिया आता या संघटनेला कसे एकत्र ठेवतात, याकडे जागतिक बाजाराचे लक्ष लागले आहे.

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

Navi Mumbai : क्षुल्लक कारणातून रिक्षाचालकाची हत्या; मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत, दोन अल्पवयीनांचाही सहभाग

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर; मागणी व पुरवठा यात मोठी तफावत