दुबई : अमेरिकेने शुक्रवारी सलग सहाव्या रात्री इराणवर हवाई हल्ले केले. या मोहिमेदरम्यान भारताची गुंतवणूक असलेल्या चाबहार बंदरालाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात बंदराच्या नियंत्रण कक्षाचे (कंट्रोल टॉवर) नुकसान झाले.
अमेरिकेने शुक्रवारी पहाटे इराणमधील पूल आणि वीज यंत्रणांना लक्ष्य करत एका महत्त्वाच्या बंदरावरील देखरेख टॉवर हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केला आहे. होर्मूझ सामुद्रधुनीवरील इराणची पकड सैल करण्यासाठी लष्करी मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमाने, ड्रोन आणि युद्धनौकांचा वापर करून इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. किनारी भागातील पाळत ठेवणारी केंद्रे, हवाई संरक्षण यंत्रणा, लष्करी रसद पुरवठा केंद्रे आणि सागरी लष्करी आस्थापने यांना या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले, असे 'सेंटकॉम'ने स्पष्ट केले.
इराणचे प्रत्युत्तर
या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या मित्रदेशांवर नवीन क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. यामध्ये युद्धात मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या कतारचाही समावेश आहे.
९ जणांचा मृत्यू
याशिवाय इराणने बहरीन आणि कुवेतलाही लक्ष्य केले. कुवेतमधील वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यामुळे तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे, कारण तेथे ९० टक्के पिण्याचे पाणी हे निर्लवणीकरण प्रक्रियेतूनच मिळते. जॉर्डनच्या सैन्यानेही इराणकडून आलेली ३ क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, उत्तर इराकच्या कुर्दीश भागातही स्फोटांचे आवाज ऐकू आले, जेथे इराणी कुर्दीश बंडखोर गट 'कोमाला'ला लक्ष्य करण्यात आल्याचे समजते, ज्यामध्ये किमान ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतासाठी चिंताजनक
चाबहार बंदराच्या विकासात भारताने मोठी गुंतवणूक केली असून, याचे संचालन ‘इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड’ ही भारतीय कंपनी करते. पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी हे बंदर भारताला मार्ग उपलब्ध करून देते.