अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेले 'व्यापारयुद्ध' काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेने चीनवर लादलेल्या १४५ टक्के आयात कराला प्रत्युत्तर म्हणून आता चीननेही अमेरिकेहून आयात होणाऱ्या वस्तूंवर ८४ टक्क्यांऐवजी १२५ टक्के आयात कर आकारण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून (दि.१२) हा कर आकारला जाणार असल्याचं चीनने स्पष्ट केलंय.
ही अमेरिकेची दडपशाही, WTO कडे तक्रार करण्याची तयारी
अमेरिकेने नव्याने आकारलेल्या टॅरिफ दरांविरोधात जागतिक व्यापार संघटनेत (WTO) अमेरिकेविरुद्ध खटला दाखल करण्याची योजनाही चीनने आखली असल्याचे वृत्त चिनी सरकारी माध्यमांनी दिले आहे. "अमेरिकेने चीनवर असामान्यपणे जास्त शुल्क लादणे हे आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, मूलभूत आर्थिक कायदे आणि सामान्य ज्ञानाचे गंभीर उल्लंघन करणारे आहे" असे चीनच्या अर्थ मंत्रालयामार्फत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा प्रकार पूर्णपणे एकतर्फी दडपशाही आणि बळजबरी आहे, असेही चीनने म्हटले आहे.
या परिस्थितीसाठी अमेरिकाच जबाबदार -
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफ दरांमुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक "अस्थिरतेसाठी" चीनने अमेरिकेलाच पूर्णपणे जबाबदार ठरवले आहे. "अमेरिकेने लादलेल्या करांमुळे जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक बाजारपेठा आणि बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेला गंभीर धक्के बसले असून तीव्र अशांतता निर्माण झाली आहे. याची "संपूर्ण जबाबदारी अमेरिकेने घ्यावी", असे बीजिंगच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंवर लादलेला आयात कर आता "अर्थशास्त्रात व्यावहारिक महत्त्व नसलेला केवळ आकड्यांचा खेळ बनला आहे", ही टॅरिफ धोरणं "अमेरिकेची दडपशाही आणि धमकी उघड करणारी आहेत. हा सगळा प्रकार निव्वळ एखादा 'जोक' ठरेल, असे बीजिंगच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
अमेरिकेने पुन्हा कर वाढवल्यास 'दुर्लक्ष' करणार -
याच्यानंतर अमेरिकेने पुन्हा शुल्क वाढवल्यास त्याकडे लक्ष देणार नाही आणि त्याला प्रत्युत्तर देखील दिले जाणार नाही असेही चीनने स्पष्ट केले आहे. "अमेरिकेच्या कोणत्याही अतिरिक्त शुल्क वाढीकडे आता दुर्लक्ष केले जाईल. कारण, अशा टॅरिफनंतर अमेरिकन मालाची आयात करणे कोणत्याही व्यापाऱ्यासाठी फायदेशीर नाहीये", असे चीनने म्हटले.