अमेरिकेतील हवाई वाहतूक व्यवस्थेला शुक्रवारी (दि. १३) रोजी मोठा तांत्रिक फटका बसला. देशभरातील हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांमधील दळणवळण यंत्रणेत बिघाड झाल्याने फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) सुरक्षेच्या कारणास्तव नवीन विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली. या निर्णयामुळे अमेरिकेतील विमानसेवा चार तासांहून अधिक काळ विस्कळीत झाली. सुमारे १५ लाख प्रवाशांना या गोंधळाचा फटका बसला असून १० हजारांहून अधिक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली. अखेर रात्री उशिरा उड्डाणबंदी उठवण्यात आली. मात्र, जुन्या तांत्रिक यंत्रणांमधील बिघाडामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले असून विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
'टाइम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार, १३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील वेळेनुसार दुपारी सुमारे ३.३६ वाजता देशातील हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांमधील दळणवळण यंत्रणेत तांत्रिक समस्या निर्माण झाली. या बिघाडाचा परिणाम अनेक एअर रूट ट्रॅफिक कंट्रोल सेंटर्सवर झाला. त्यामुळे विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि वैमानिकांशी संपर्क साधणे यामध्ये अडचणी निर्माण झाल्या.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत FAA ने देशभरातील नवीन विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली. त्यावेळी अमेरिकेच्या हवाई हद्दीत ३,५०० हून अधिक विमाने उड्डाण करत होती. मात्र, आधीच हवेत असलेल्या विमानांना नियोजित ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे ही बंदी मुख्यतः नव्याने होणाऱ्या उड्डाणांवर लागू होती.
अमेरिकेचे वाहतूकमंत्री शॉन डफी यांच्या माहितीनुसार, रात्री ८ वाजेपर्यंत अमेरिकेच्या हवाई हद्देतील विमानांची संख्या ४०० पेक्षा कमी झाली होती. त्यानंतर रात्री ८.१५ वाजता उड्डाणांवरील निर्बंध उठवण्यात आले. मात्र, उड्डाणांना परवानगी मिळाली तरी विमानसेवा लगेच सुरळीत झाली नाही.
विमानसेवा ठप्प होण्यामागे नेमकं कारण काय?
अमेरिकेचे वाहतूकमंत्री शॉन डफी यांनी या बिघाडासाठी जुनी झालेली दूरसंचार उपकरणे जबाबदार असल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या स्विचेस, राउटर्स आणि तांब्याच्या तारांवर माहितीचा अतिरिक्त भार पडल्याने यंत्रणा विसंगत माहिती पाठवू लागली.
हवाई वाहतूक नियंत्रक विमानांच्या हालचालींचे नियोजन करण्यासाठी आणि वैमानिकांशी संपर्क राखण्यासाठी या यंत्रणेचा वापर करतात. मात्र, यंत्रणेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विमानांच्या सुरक्षित संचालनावर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे FAA ने खबरदारी म्हणून नवीन उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला.
डफी यांनी व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्था अनेक दशकांपूर्वीच्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बिघाड भविष्यातही होऊ शकतात.
लाखो प्रवाशांचे हाल
या तांत्रिक बिघाडाचा अमेरिकेतील अनेक विमानतळांवर परिणाम झाला. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, हवाई वाहतूक विश्लेषण करणाऱ्या सिरियम कंपनीच्या अंदाजानुसार, सुमारे १५ लाख प्रवाशांना या घटनेचा फटका बसला.
देशभरात १० हजारांहून अधिक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला किंवा ती रद्द करण्यात आली. ABC News ने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ६.०४ वाजेपर्यंत १,९१३ उड्डाणे रद्द झाली होती, तर १०,४९४ उड्डाणांना विलंब झाला होता.
सिरियमच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी ७.०५ वाजेपर्यंत किमान ८२७ विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते. त्यापैकी ६७० विमाने त्यांच्या मूळ प्रस्थान विमानतळांवर परत पाठवण्यात आली, तर १५७ विमाने इतर विमानतळांकडे वळवण्यात आली.
जेटब्लूने शुक्रवारी उर्वरित सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. मात्र, न्यूयॉर्कमधील जेएफके विमानतळ आणि बोस्टन येथून युरोपकडे जाणाऱ्या काही विमानसेवांना यातून वगळण्यात आले. शनिवारच्या उड्डाणांवरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा कंपनीने दिला.
आधीच हवेत असलेल्या विमानांचे काय झाले?
देशभरातील नवीन उड्डाणे थांबवण्यात आली असली तरी आधीच हवेत असलेल्या विमानांना तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्याचे आदेश देण्यात आले नव्हते. या विमानांना उपलब्ध दळणवळण आणि देखरेख यंत्रणांच्या मदतीने सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी पोहोचवण्यात आले.
FAA च्या नियमांनुसार, वैमानिकांचा हवाई वाहतूक नियंत्रकांशी रेडिओ संपर्क तुटल्यास त्यांना विशिष्ट प्रक्रियांचे पालन करावे लागते. अशा वेळी परिस्थितीनुसार विमान सुरक्षित ठिकाणी उतरवणे किंवा निर्धारित मार्ग आणि उंचीचे नियम पाळून प्रवास सुरू ठेवणे आवश्यक असते. रेडिओ संपर्क तुटल्याचे दर्शवण्यासाठी वैमानिक ट्रान्सपॉन्डरवर ७६०० हा विशेष कोड वापरतात. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश हवेत असलेल्या विमानांची सुरक्षितता कायम ठेवणे आणि आधीच तणावाखाली असलेल्या हवाई वाहतूक व्यवस्थेवर आणखी भार पडू न देणे हा होता.
ट्रम्प प्रशासनाने काय भूमिका घेतली?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी या घटनेबाबत चर्चा झाल्याची माहिती वाहतूकमंत्री शॉन डफी यांनी दिली. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकेचे अंतर्गत सुरक्षा मंत्री मार्कवेन मुलिन यांनी या घटनेमागे जाणीवपूर्वक केलेला हल्ला किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कोणतेही संकेत नसल्याचे सांगितले. FAA ने अलीकडे सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'स्मार्ट' यंत्रणेचा या बिघाडाशी संबंध आहे का, याचीही तपासणी करण्यात आली. मात्र, या यंत्रणेमुळेच उड्डाणबंदी लागू झाली, असे कोणतेही संकेत मिळाले नाहीत.
पुढे काय होणार?
FAA ने देशव्यापी उड्डाणबंदी उठवली असली तरी विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे. रद्द झालेली उड्डाणे, मार्ग बदललेली विमाने आणि विस्कळीत झालेले वेळापत्रक यांचा परिणाम पुढील काही दिवस जाणवू शकतो.
विमान कंपन्यांना त्यांची विमाने आणि कर्मचारी पुन्हा नियोजित ठिकाणी पोहोचवावे लागणार आहेत. तसेच अडकलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. दुसरीकडे, FAA आणि संबंधित यंत्रणांकडून तांत्रिक बिघाडाच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. अमेरिकेच्या जुन्या हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा झाल्या नाहीत, तर भविष्यातही अशा अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने आता या व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष लागले आहे.