मध्यपूर्वेतील तणाव वाढला; अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणचा बहरीन-कुवेतवर प्रतिहल्ला (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

मध्यपूर्वेतील तणाव वाढला; अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणचा बहरीन-कुवेतवर प्रतिहल्ला

रविवारी (दि.२८) पहाटे कुवेतवर करण्यात आलेला हल्ला हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तात्पुरत्या युद्धबंदी करारानंतरचा पहिलाच हल्ला मानला जात आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने शनिवारी (दि.२७) इराणमधील लष्करी ठिकाणांवर दुसऱ्यांदा हवाई हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन आणि कुवेतवर ड्रोन व क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान नुकत्याच झालेल्या युद्धबंदी करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

युद्धबंदीनंतर पहिलाच मोठा हल्ला

रविवारी (दि.२८) पहाटे कुवेतवर करण्यात आलेला हल्ला हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तात्पुरत्या युद्धबंदी करारानंतरचा पहिलाच हल्ला मानला जात आहे. याचवेळी अमेरिकन नौदलाच्या देखरेखीखालील बहुराष्ट्रीय सागरी सुरक्षा संस्थेने ओमानजवळील सामुद्रधुनीत जहाजांच्या ये-जा मार्गाचा विस्तार करण्याची घोषणा केली. त्यामुळे या भागातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचे कोणत्या ठिकाणांवर हल्ले?

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्करी देखरेख यंत्रणा, संप्रेषण व्यवस्था, हवाई संरक्षण केंद्रे, ड्रोन साठवणूक केंद्रे आणि सागरी सुरुंग पेरणाऱ्या क्षमतांवर हवाई हल्ले करण्यात आले. हे हल्ले शनिवारी पहाटे समुद्रातील एका तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आल्याचे अमेरिकेने सांगितले.

कतारचे कच्चे तेल वाहून नेणाऱ्या जहाजावर हल्ला

पनामा ध्वजाखाली नोंदणीकृत 'किकू' या तेलवाहू जहाजावर हल्ला झाला होता. हे जहाज कतारच्या सरकारी ऊर्जा कंपनीसाठी कच्चे तेल घेऊन संयुक्त अरब अमिरातीकडे जात होते. हे जहाज इराणच्या पाण्याऐवजी ओमान किनाऱ्यालगत तयार करण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करत होते.

अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणला युद्धबंदी कराराचे पालन करण्याची संधी होती. मात्र, त्यांनी जहाजावर हल्ला करून कराराचे उल्लंघन केले.

ट्रम्प यांचा इशारा

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अमेरिकेने इराणमधील क्षेपणास्त्र, ड्रोन साठवणूक केंद्रे आणि किनारपट्टीवरील रडार केंद्रांवर हल्ले केल्याचे सांगितले.

"इराणने पुन्हा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आहे. आम्ही संयम बाळगत आहोत. मात्र, अशी वेळ आली की अमेरिकेला लष्करी कारवाई पूर्ण करावी लागेल. तसे झाल्यास इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अस्तित्वच राहणार नाही," असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.

ओमानजवळील जहाजावर हल्ल्यानंतर कारवाई

गेल्या गुरुवारीही ओमान किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर इराणी ड्रोनने हल्ला केला होता. त्यावेळीही अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल इराणमधील लष्करी ठिकाणांवर हवाई कारवाई केली होती.

कुवेतने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखली

रविवारी पहाटे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. कुवेतच्या लष्कराने हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने हे सर्व हल्ले परतवून लावल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कुवेतमध्ये अमेरिकेचा मोठा लष्करी तळ आहे.

बहरीनवरही ड्रोन हल्ला

बहरीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, इराणकडून अनेक ड्रोन देशाच्या दिशेने पाठवण्यात आले. नागरिक आणि रहिवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा हा गंभीर प्रकार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. या हल्ल्यातही कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने सरकारी वृत्तसंस्था IRNA मार्फत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, "प्रदेशातील अमेरिकन लष्कराच्या विविध ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले," असे म्हटले आहे. मात्र, कोणत्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले याचा तपशील देण्यात आलेला नाही.

बहरीनमध्ये अमेरिकेच्या पाचव्या नौदलाचा तळ

बहरीन हा इराणचा कट्टर विरोधक मानला जातो. अमेरिकेच्या नौदलाचा पाचवा ताफा (5th Fleet) बहरीनमध्ये तैनात आहे. नुकतीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीत इराणचे हल्ले थांबवण्याचे आणि होर्मुझ सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी खुली ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी सोशल मीडियावर म्हटले की, युद्धबंदी कराराबाबत काही मतभेद असतील तर इराणने चर्चा करावी. मात्र, "हिंसेला हिंसेनेच उत्तर दिले जाईल," असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

युद्धबंदी करारात कोणते मुद्दे?

अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक, इराणचा अणुकार्यक्रम, समृद्ध युरेनियमचा साठा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. या तात्पुरत्या करारानुसार दोन्ही देशांना अंतिम तोडगा काढण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच लेबनॉनमधील संघर्ष संपवणे आणि हिझबुल्लाशी संबंधित प्रश्न सोडवणे हाही या कराराचा महत्त्वाचा भाग आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवरील धोका कायम

ब्रिटनच्या युनायटेड किंगडम मॅरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) या संस्थेने शनिवारी होर्मुझ सामुद्रधुनीत एका तेलवाहू जहाजावर हल्ला झाल्याची माहिती दिली. जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असून पर्यावरणाचे नुकसान झालेले नाही. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी संशयाची सुई इराणकडे वळली आहे.

जहाजांसाठी नवा मार्ग, पण धोका कायम

या घटनेनंतर अमेरिकन नौदलाच्या देखरेखीखालील जॉइंट मॅरिटाईम इन्फॉर्मेशन सेंटर (JMIC) ने ओमान किनाऱ्यालगत जहाजांच्या ये-जा मार्गाचा विस्तार करण्याची घोषणा केली.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांनी त्यांच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा मार्ग वापरण्यासाठी शुल्क आकारले जाईल, असा इशारा दिला आहे. मात्र अमेरिका आणि आखाती देशांनी हा दावा फेटाळला असून ही सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जलमार्ग असल्याची भूमिका घेतली आहे.

JMIC ने जहाजांना इशारा देताना या परिसरात सागरी सुरुंगांचा धोका कायम असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जहाजांनी सावधगिरी बाळगावी, तसेच परिसरात नौदलाची उपस्थिती कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेची कारवाई

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (IMO) जहाजांच्या सुरक्षित स्थलांतराची नवीन मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे. इतर जहाजांवर हल्ले होणार नाहीत, याची खात्री मिळाल्यानंतरच ही मोहीम पुन्हा सुरू केली जाईल, असे संघटनेने सांगितले. गेल्या काही दिवसांत सुमारे ११५ जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याची माहितीही देण्यात आली.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

भिवंडीत भीषण अग्नितांडव! मुंबई-नाशिक महामार्गावरील टायर व लाकडी पॅलेटच्या गोदामाला आग, Video

Mumbai : सात टक्के पाणी शिल्लक; धरणातील पाणीसाठा तळ गाठतोय; पावसाची ओढ कायम

रेशनकार्डवरील नावाद्वारे कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही! दिवाणी न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : 'जे. जे.'ची स्थिती पाहता पालिकेने सावध होण्याची गरज; पालिका विरोधी पक्षनेत्यांची सूचना

Mumbai : सोमवारपासून मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी लोकल; वातानुकूलित सेवांची संख्या १२० होणार