ट्रम्प यांना सिनेटची वेसण, युद्ध अधिकारांवर मर्यादा (Photo-X/@ABC7NY)
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांना सिनेटची वेसण, युद्ध अधिकारांवर मर्यादा

अमेरिकन सिनेटमध्ये मंगळवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणमधील युद्ध अधिकारांवर मर्यादा घालणारा ठराव ५० विरुद्ध ४७ मतांनी मंजूर करण्यात आला. डेमॉक्रॅटिक पक्षाने आणलेल्या या ठरावाला चार रिपब्लिकन खासदारांनी पाठिंबा दिला, ज्यामुळे हा ठराव मंजूर होऊ शकला. डेमॉक्रॅट्सचा हा या संदर्भातील आठवा प्रयत्न होता.

Swapnil S

वाशिंग्टन : अमेरिकन सिनेटमध्ये मंगळवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणमधील युद्ध अधिकारांवर मर्यादा घालणारा ठराव ५० विरुद्ध ४७ मतांनी मंजूर करण्यात आला. डेमॉक्रॅटिक पक्षाने आणलेल्या या ठरावाला चार रिपब्लिकन खासदारांनी पाठिंबा दिला, ज्यामुळे हा ठराव मंजूर होऊ शकला. डेमॉक्रॅट्सचा हा या संदर्भातील आठवा प्रयत्न होता.

डेमॉक्रॅटिक सिनेटर टिम केन यांनी हा ठराव मांडला होता. या ठरावानुसार, जोपर्यंत संसदेने अधिकृतपणे युद्धाची घोषणा केलेली नसेल किंवा लष्करी बळाचा वापर करण्यास विशेष मंजुरी दिली नसेल, तोपर्यंत अमेरिकन अध्यक्षांना इराणविरुद्ध सुरू असलेल्या कोणत्याही लष्करी कारवाया किंवा संघर्षामधून अमेरिकन सैन्य मागे घ्यावे लागेल. सुझान कॉलिन्स, लिसा मुरकोव्स्की, रँड पॉल आणि बिल कॅसिडी अशी डेमॉक्रॅट्सच्या बाजूने मतदान करणाऱ्या चार रिपब्लिकन सिनेटर्सची नावे आहेत.

युद्ध 'लवकरच' संपणार - ट्रम्प

इराण अमेरिकेसोबत करार करण्यासाठी प्रचंड उत्सुक असून सध्या सुरू असलेला संघर्ष 'खूप लवकर' संपुष्टात येईल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केला आहे. एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण होईल असे सांगितले. जगात सध्या तेलाचा मुबलक पुरवठा असल्याने जागतिक बाजारात तेलाचे दर वेगाने खाली येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बाजारपेठेत सध्या भरपूर तेल उपलब्ध आहे, त्यामुळे किमती झपाट्याने कोसळणार आहेत. आम्ही हे युद्ध खूप लवकर संपवणार आहोत. इराणला हा करार करण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच तेलाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळेल, असे ट्रम्प म्हणाले.

इराण युद्धात अमेरिकेने गमावली ४२ विमाने

इराणला लक्ष्य करून २८ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' दरम्यान अमेरिकेची फायटर जेट्स आणि ड्रोनसह किमान ४२ विमाने नष्ट किंवा खराब झाली आहेत, अशी माहिती एका अधिकृत अहवालातून समोर आली आहे.

यूएस काँग्रेसला (संसद) धोरणात्मक आणि कायदेशीर विश्लेषण पुरवणाऱ्या 'काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस'ने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, गोपनीयतेचे नियम, सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि नुकसानीचे अचूक कारण यांमुळे विमानांच्या नुकसानीच्या या संख्येत भविष्यात बदल होऊ शकतो. संरक्षण मंत्रालय आणि यूएस सेंट्रल कमांडच्या अधिकृत विधानांचा तसेच विविध बातम्यांचा अभ्यास करून ही आकडेवारी संकलित करण्यात आली आहे.

खर्चात मोठी वाढ

१२ मे रोजी झालेल्या 'हाउस अप्रोप्रिएशन्स सबकमिटी'च्या सुनावणीदरम्यान, पेंटागॉनचे हंगामी नियंत्रक जुल्स डब्लू. हर्स्ट (तिसरे) यांनी सांगितले की, इराणमधील लष्करी मोहिमांचा खर्च आता तब्बल २९ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे. युद्धातील उपकरणांची दुरुस्ती आणि नवीन खरेदीच्या बदल्यात येणाऱ्या खर्चाच्या सुधारित अंदाजामुळे हा खर्च वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इंधनाचा पुरेसा साठा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आश्वस्त

NEET Paper Leak : नीट पेपर फुटीचे असे शिजले कारस्थान

सात धरणांमध्ये फक्त २० टक्के पाणीसाठा; राखीव पाणीसाठा मुंबईला तारणार, राज्य सरकारची मंजुरी

मोदी-शहा देशद्रोही, राहुल गांधींचा घणाघात

भारत-इटली द्विपक्षीय चर्चा; व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर भर; २०२९पर्यंत २२ अब्ज युरो व्यापाराचे लक्ष्य