बकरी ईद जवळ आली की घराघरांत खास मटणाच्या रेसिपींची तयारी सुरू होते. बिर्याणी, कोरमा आणि मटण रस्स्यासोबत काहीतरी वेगळं आणि चविष्ट ट्राय करायचं असेल, तर 'कोथिंबीर मटण फ्राय' हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ताज्या कोथिंबिरीचा सुगंध, खोबऱ्याची चव आणि मसाल्यांचा झणझणीत फ्लेवर यामुळे ही रेसिपी प्रत्येक नॉनव्हेज प्रेमीला नक्की आवडेल. विशेष म्हणजे ही डिश रोटी, भाकरी किंवा पराठ्यासोबत भन्नाट लागते.
साहित्य :
५०० ग्रॅम मटण
४ कांद्यांची पेस्ट
२०० ग्रॅम कोथिंबीर
५०० ग्रॅम सुकं खोबरं
१ टीस्पून हळद
अर्धा टीस्पून लाल तिखट
३ ते ४ मिरी
अर्धा टीस्पून जिरेपूड
३ ते ४ लवंगा
१ इंच दालचिनी
२ हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
१ टीस्पून गरम मसाला
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
अर्धा टेबलस्पून लिंबाचा रस
फोडणीसाठी
१ टीस्पून मोहरी
८ ते १० कढीपत्त्याची पानं
कृती :
सर्वप्रथम मिरी, लवंग आणि दालचिनी यांसारखे अख्खे मसाले बारीक वाटून घ्या. त्यानंतर मटणामध्ये हळद, लाल तिखट, जिरेपूड, गरम मसाला, मीठ, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घालून चांगलं मॅरिनेट करा. हे मटण किमान २ तास बाजूला ठेवा.
आता प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालून चांगलं परता. त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून मटण शिजवून घ्या.
यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि सुकं खोबरं एकत्र वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट शिजलेल्या मटणामध्ये घालून काही मिनिटं मंद आचेवर शिजवा.
शेवटी एका छोट्या पॅनमध्ये मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा आणि ती मटणावर ओता. गरमागरम कोथिंबीर मटण फ्राय सर्व्ह करा.
टिप्स :
जास्त झणझणीत चव हवी असल्यास हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता.
मटण अधिक मऊ होण्यासाठी ते जास्त वेळ मॅरिनेट करा.
ताज्या कोथिंबीरीचा वापर केल्यास रेसिपीचा फ्लेवर अधिक छान लागतो.
ही डिश ज्वारीच्या भाकरीसोबत चविष्ट लागते.