Cinnamon Tea : रोजचा दूध-साखरेचा चहा सोडा, थंडीत प्या दालचिनीचा चहा; चवही छान, जाणून घ्या फायदे अन् बनवण्याची योग्य पद्धत 
लाईफस्टाईल

Cinnamon Tea : रोजचा दूध-साखरेचा चहा सोडा, थंडीत प्या दालचिनीचा चहा; चवही छान, जाणून घ्या फायदे अन् बनवण्याची योग्य पद्धत

रोजचा दूध-साखरेचा चहा पिऊन कंटाळलात? हिवाळ्यात घरच्या घरी दालचिनीचा सुगंधी चहा कसा बनवायचा, त्याचे संभाव्य फायदे आणि सेवन करताना घ्यायची काळजी जाणून घ्या.

Mayuri Gawade

सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांना आधी चहाचा कप हवा असतो. तर काही जण दिवसभराच्या कामातून थोडा ब्रेक मिळाला की चहा पिणं पसंत करतात. रोजचा दूध आणि साखर घातलेला चहा पिण्यापेक्षा हेल्दी पर्याय शोधत असाल, तर स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या दालचिनीपासून तुम्ही सुगंधी आणि चविष्ट चहा तयार करू शकता.

विशेषतः हिवाळ्यात गरमागरम दालचिनीचा चहा प्यायला छान वाटतो. दालचिनीमुळे चहाला वेगळी चव आणि सुगंध मिळतो. शिवाय, साखर न घालता किंवा कमी गोडवा ठेवूनही हा चहा पिता येतो. त्यामुळे नेहमीच्या साखर घातलेल्या चहाला पर्याय म्हणून तो निवडता येऊ शकतो. चला तर मग, दालचिनीचा चहा पिण्याचे संभाव्य फायदे आणि तो बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

दालचिनीचा चहा पिण्याचे ६ फायदे

१. पचनासाठी मदत होऊ शकते

दालचिनीचा वापर पारंपरिक पद्धतीने पचनाशी संबंधित तक्रारींमध्ये केला जातो. जेवणानंतर कोमट दालचिनीचा चहा प्यायल्याने काही लोकांना पोट हलके वाटू शकते.

२. अँटीऑक्सिडंट्सचा स्रोत

दालचिनीमध्ये पॉलीफेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट घटक असतात. हे घटक शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण मिळण्यास मदत करतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून मर्यादित प्रमाणात दालचिनीचा वापर करता येतो.

३. हृदयाच्या आरोग्याशी संबंधित घटक

दालचिनीचा कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबावर होणारा संभाव्य परिणाम काही संशोधनांमध्ये अभ्यासण्यात आला आहे. मात्र, केवळ दालचिनीचा चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे सिद्ध झालेले नाही.

४. थंडीत उबदार पेयाचा पर्याय

हिवाळ्यात गरमागरम पेय प्यायल्याने शरीराला आणि घशाला आरामदायी वाटू शकते. दालचिनीचा सुगंध आणि चव यामुळे नेहमीच्या चहापेक्षा वेगळा अनुभव मिळतो.

५. साखरेचे सेवन कमी ठेवण्यास मदत

दालचिनीच्या चहात साखर न घालताही त्याची चव आणि सुगंध अनुभवता येतो. त्यामुळे चहामधील साखरेचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा एक पर्याय ठरू शकतो.

घरच्या घरी असा बनवा दालचिनीचा चहा

दालचिनीचा चहा बनवण्यासाठी फार साहित्याची गरज नाही. काही मिनिटांत हा चहा सहज तयार करता येतो.

साहित्य :

  • पाणी - १ कप

  • दालचिनी- १ छोटा तुकडा (सुमारे १ इंच)

  • आले - अर्धा इंच (ऐच्छिक)

  • लिंबाचा रस - काही थेंब (ऐच्छिक)

  • मध - चवीनुसार (ऐच्छिक)

कृती :

१. सर्वप्रथम एका पातेल्यात एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा.

२. पाण्याला उकळी येऊ लागल्यावर त्यात दालचिनीचा छोटा तुकडा घाला. आवडत असल्यास त्यात किसलेले किंवा ठेचलेले आलेही घालू शकता.

३. हे पाणी मंद आचेवर साधारण ५ ते ७ मिनिटे उकळू द्या. त्यामुळे दालचिनीचा सुगंध आणि चव पाण्यात उतरते.

४. त्यानंतर गॅस बंद करून चहा दोन मिनिटे झाकून ठेवा. मग चहणीने गाळून कपात घ्या.

५. आवडीनुसार त्यात काही थेंब लिंबाचा रस घालू शकता. चहा थोडा कोमट झाल्यावरच मध घाला. साखर न घालताही हा चहा पिता येतो.

दालचिनीचा चहा पिताना कोणती काळजी घ्यावी?

दालचिनीचा चहा मर्यादित प्रमाणात पिणे योग्य आहे. रोज मोठ्या प्रमाणात किंवा खूप घट्ट दालचिनीचा काढा पिणे टाळावे. बाजारात मिळणाऱ्या काही प्रकारच्या दालचिनीमध्ये कौमारिन (Coumarin) नावाचा घटक असतो. त्याचे जास्त प्रमाण दीर्घकाळ घेतल्यास यकृतावर परिणाम होऊ शकतो.

यकृताचा आजार असल्यास, गर्भवती असल्यास किंवा नियमित औषधे घेत असल्यास दालचिनीचे नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लक्षात ठेवा : दालचिनीचा चहा हा रोजच्या आहारात घेता येणारा एक पर्यायी गरम पेयप्रकार आहे. मात्र, तो मधुमेह, हृदयविकार, सर्दी किंवा पचनाच्या समस्यांवरील औषधोपचारांचा पर्याय नाही.

भारतात अश्लील अन् हिंसक कंटेंटला लगाम; मेटाकडून Instagram च्या रिकमेंडेशन सिस्टीममध्ये बदल

मुंबईकरांनो, टॅक्सीचालकांची मनमानी आता थांबणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकांवर सुरू होणार प्रीपेड टॅक्सी सेवा

मोठा अनर्थ टळला! Indigo विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच पायलटने धोका ओळखला; इमर्जन्सी ब्रेक दाबला अन् २२९ प्रवासी वाचले

आंध्र प्रदेशात ONGC च्या विहिरीतून मोठी गॅसगळती; १ किमी परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं, Video

Pune : भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद