Digital Eye Strain : दिवसभर स्क्रीनसमोर काम करता? डोळ्यांवर होऊ शकतो गंभीर परिणाम; 'ही' लक्षणे वेळीच ओळखा  संग्रहित छायाचित्र
लाईफस्टाईल

Digital Eye Strain : दिवसभर स्क्रीनसमोर काम करता? डोळ्यांवर होऊ शकतो गंभीर परिणाम; 'ही' लक्षणे वेळीच ओळखा

डोळ्यांच्या आसपास किंवा कपाळात डोकेदुखी, प्रकाशाची जास्त संवेदनशीलता आणि मान, खांदे किंवा पाठदुखीचाही त्रास होऊ शकतो.

किशोरी घायवट-उबाळे

आजच्या डिजिटल युगात मोबाइल, कॉम्प्युटर, टॅबलेट आणि इतर स्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. या समस्येला कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (Computer Vision Syndrome) किंवा डिजिटल आय स्ट्रेन असे म्हणतात. जास्त वेळ स्क्रीन पाहणे, कमी पापण्या लवणे आणि स्क्रीन वापरण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे ही समस्या वाढू शकते.

डोळ्यांना थकवा जाणवणे हे प्रमुख लक्षण

डिजिटल आय स्ट्रेनमध्ये डोळ्यांना थकवा किंवा जडपणा जाणवू शकतो. डोळ्यांत कोरडेपणा, जळजळ आणि खाज येणे, तसेच डोळे लाल होणे किंवा पाणी येणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

काही जणांना स्क्रीन पाहिल्यानंतर दृष्टी धूसर होणे किंवा वारंवार फोकस बदलण्यास त्रास होऊ शकतो. डोळ्यांच्या आसपास किंवा कपाळात डोकेदुखी, प्रकाशाची जास्त संवेदनशीलता आणि मान, खांदे किंवा पाठदुखीचाही त्रास होऊ शकतो.

स्क्रीनकडे सतत पाहणे हे मुख्य कारण

सलग अनेक तास मोबाइल किंवा कॉम्प्युटर वापरणे हे या समस्येचे प्रमुख कारण आहे. स्क्रीनकडे लक्षपूर्वक पाहताना आपण नेहमीपेक्षा कमी पापण्या लवतो. त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढू शकतो.

स्क्रीनचा जास्त प्रकाश, त्यावर पडणारी चमक, चुकीच्या अंतरावरून स्क्रीन पाहणे आणि चुकीची बसण्याची पद्धत यामुळेही डोळ्यांवर ताण येऊ शकतो. खूप लहान अक्षरे, कमी कॉन्ट्रास्ट आणि अतिशय अंधाऱ्या किंवा खूप तेजस्वी वातावरणात स्क्रीन वापरणेही त्रासदायक ठरू शकते.

तसेच, चष्म्याचा नंबर असताना योग्य नंबरचा चष्मा न वापरल्यास डोळ्यांचा ताण वाढू शकतो.

'हा' नियम ठेवा लक्षात

डिजिटल आय स्ट्रेनचा त्रास कमी करण्यासाठी २०-२०-२० नियम लक्षात ठेवा. दर २० मिनिटांनी स्क्रीनपासून नजर हटवून सुमारे २० फूट अंतरावरील वस्तूकडे २० सेकंद पाहा.

स्क्रीन डोळ्यांपासून आरामदायी अंतरावर ठेवा. स्क्रीनची वरची बाजू डोळ्यांच्या पातळीपेक्षा किंचित खाली असणे योग्य ठरते. स्क्रीनचा ब्राइटनेस आजूबाजूच्या प्रकाशानुसार ठेवा आणि स्क्रीनवर थेट प्रकाश किंवा चमक पडणार नाही याची काळजी घ्या.

मोबाइल आणि कॉम्प्युटर वापरताना मध्येच नियमित ब्रेक घेणेही महत्त्वाचे आहे.

Sujok Therapy बाबत काय सांगितले जाते?

काही ठिकाणी Sujok Therapy मध्ये हातावरील डोळे आणि मेंदूशी संबंधित मानल्या जाणाऱ्या बिंदूंवर दाब देण्याची पद्धत सांगितली जाते. या बिंदूंवर काही मिनिटे दाब देऊन त्यावर मूगाचे दाणे ठेवण्याचा उपायही सांगितला जातो.

मात्र, या पद्धतीमुळे डिजिटल आय स्ट्रेनला तात्काळ आराम मिळतो, असा दावा सर्वांसाठी वैद्यकीय उपचाराचा पर्याय मानता येत नाही. डोळ्यांच्या सतत किंवा वाढत्या त्रासासाठी योग्य नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

डोळ्यांचा त्रास वारंवार होत असेल किंवा लक्षणे वाढत असतील, तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. योग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. विशेषतः दृष्टी धूसर होणे किंवा इतर गंभीर लक्षणे जाणवत असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले