

दिवसभर तासन्तास बसून काम करणे, चुकीच्या पद्धतीने वाकणे, वजन उचलणे किंवा अचानक हालचाल केल्याने कंबरेत अचानक तीव्र वेदना जाणवू शकतात. अनेकदा ही समस्या स्नायूंवर ताण आल्यामुळे किंवा कंबरेमध्ये आखडलेपणा आल्यामुळे होते. मात्र, वेदना सतत राहिल्या किंवा तीव्र होत गेल्या तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
कंबरदुखीची प्रमुख लक्षणं कोणती?
कंबरेच्या खालच्या भागात अचानक टोचल्यासारखी किंवा ओढ लागल्यासारखी वेदना होणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. यासोबत खालील त्रासही जाणवू शकतात.
वाकताना, उभे राहताना किंवा शरीर वळवताना त्रास होणे.
बराच वेळ बसल्यानंतर किंवा सकाळी उठताना कंबरेत आखडलेपणा जाणवणे.
हालचाल केल्यावर वेदना वाढणे.
कंबरेमध्ये ताण किंवा खेचल्यासारखे वाटणे.
कंबरदुखीची कारणं काय?
कंबरदुखीची अनेक कारणे असू शकतात. स्नायू किंवा लिगामेंटवर ताण येणे, चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा बराच वेळ एकाच जागी बसून राहणे ही त्यातील सामान्य कारणे आहेत. याशिवाय अचानक वाकणे, शरीर वळवणे किंवा जड वस्तू उचलणे यामुळेही कंबरेवर ताण येऊ शकतो.
पोटाचे आणि पाठीचे स्नायू कमकुवत असणे तसेच नियमित शारीरिक हालचाल न करणे यामुळेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. काही वेळा मणक्याशी संबंधित समस्येमुळेही कंबरदुखी होऊ शकते.
कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
कंबरदुखी सुरू झाल्यानंतर काही काळ विश्रांती घेणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, दीर्घकाळ बेडवर पडून राहणे टाळावे. कंबरेला आराम मिळत असेल तर १५ ते २० मिनिटांसाठी कोमट पाण्याची पिशवी किंवा गरम शेक घेऊ शकता.
वेदना कमी होईपर्यंत जड वस्तू उचलणे आणि अचानक वाकणे किंवा शरीर वळवणे टाळावे. डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हलके स्ट्रेचिंग आणि योगासने केल्याने शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते.
बसण्याच्या पद्धतीकडेही द्या लक्ष
बराच वेळ बसून काम करत असल्यास बसण्याची योग्य पोझिशन ठेवणे महत्त्वाचे आहे. कंबरेला आधार मिळेल अशा पद्धतीने बसा आणि मध्येच काही मिनिटे उठून हालचाल करा. नियमित शारीरिक हालचालीमुळे पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत होते.
सुजोक थेरपीबाबत काय?
माहितीनुसार, सुजोक पद्धतीमध्ये कंबरेच्या वेदनांशी संबंधित हातावरील विशिष्ट भागावर दिवसातून दोन वेळा ५ ते १० मिनिटे मसाज करण्याचा आणि त्यानंतर त्या भागावर खजुराच्या बिया (date seeds) काही तास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, सुजोक थेरपीच्या परिणामकारकतेबाबत पुरेसा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याने ती वैद्यकीय उपचारांचा पर्याय मानू नये. या पद्धतीमुळे त्रास वाढला किंवा अस्वस्थता जाणवली तर ती थांबवावी.
वेदना कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
सामान्य स्नायूंच्या ताणामुळे झालेली कंबरदुखी अनेकदा विश्रांती आणि योग्य काळजी घेतल्याने कमी होऊ शकते. मात्र, वेदना तीव्र असतील, सतत राहात असतील किंवा दिवसेंदिवस वाढत असतील तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मणक्याशी संबंधित समस्या असल्यास योग्य निदान आणि उपचार महत्त्वाचे ठरतात.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)