

कोपरात सतत दुखत राहणे ही समस्या अनेकदा हळूहळू वाढते. वस्तू उचलताना, व्यायाम करताना, टायपिंग करताना किंवा हाताची वारंवार हालचाल करताना हा त्रास अधिक जाणवू शकतो. अतिवापर, स्नायू किंवा टेंडनवर आलेला ताण तसेच चुकीची पोश्चर यामुळे कोपरदुखी होण्याची शक्यता असते. आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ, थेरपिस्ट, समुपदेशक आणि योग चिकित्सक राजश्री वोरा यांच्या मते, कोपरदुखीचा त्रास जाणवत असल्यास सुरुवातीपासूनच योग्य काळजी घेणे आणि वेदना वाढवणाऱ्या हालचाली टाळणे महत्त्वाचे आहे.
कोपरदुखीची प्रमुख लक्षणे कोणती?
कोपराच्या भागात सतत बोथट वेदना जाणवणे, हात हलवताना कडकपणा किंवा अस्वस्थता जाणवणे ही याची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय वस्तू उचलताना वेदना होणे, कोपराभोवती सौम्य सूज किंवा स्पर्श केल्यावर दुखणे, तसेच हात किंवा मनगटाची ताकद कमी झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
कोपरदुखीची कारणे काय?
हाताच्या किंवा कोपराच्या सतत होणाऱ्या हालचालींमुळे त्यावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. खेळ किंवा दैनंदिन कामांमध्ये वारंवार एकाच प्रकारची हालचाल केल्याने Tennis Elbow किंवा Golfer's Elbow सारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय स्नायू किंवा टेंडनवर आलेला ताण, दीर्घकाळ संगणकावर काम करताना चुकीची पोश्चर, जुनी दुखापत किंवा संधिवात यामुळेही कोपर दुखू शकतो.
कोपरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काय कराल?
वेदना वाढवणाऱ्या हालचाली काही काळ टाळून कोपराला पुरेशी विश्रांती द्यावी. नुकतीच दुखापत झाली असेल किंवा सूज आली असेल तर १५ ते २० मिनिटे कोल्ड पॅक लावल्याने आराम मिळण्यास मदत होऊ शकते. वेदना कमी झाल्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने हलके स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग व्यायाम करता येतात.
काम करताना पोश्चरकडे लक्ष द्या
संगणकावर दीर्घकाळ काम करणाऱ्यांनी हात आणि कोपराला योग्य आधार मिळेल याची काळजी घ्यावी. तसेच दुखत असलेल्या हाताने वारंवार जड वस्तू उचलणे टाळावे. कोपरावर वारंवार ताण येणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोपरदुखीकडे दुर्लक्ष करू नका
कोपरदुखी सतत राहत असेल, हालचालींवर परिणाम होत असेल किंवा हाताची ताकद कमी होत असल्याचे जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषतः दुखापतीनंतर वेदना वाढत असल्यास स्वतःहून उपचार करण्याऐवजी तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे योग्य ठरेल.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)