बेसनाच्या मसालेदार सारणाची कुरकुरीत कचोरी; घरच्या घरी ट्राय करा सोपी रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

बेसनाच्या मसालेदार सारणाची कुरकुरीत कचोरी; घरच्या घरी ट्राय करा सोपी रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खमंग, कुरकुरीत आणि मसालेदार स्टफ्ड बेसन कचोरी. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी साहित्य, कृती आणि खास टिप्स....

किशोरी घायवट-उबाळे

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी खमंग, कुरकुरीत आणि मसालेदार खायची इच्छा झाली असेल तर बेसन कचोरी हा उत्तम पर्याय आहे. मैद्याच्या पिठात मसालेदार बेसनाचे सारण भरून तयार केलेली ही कचोरी बाहेरून कुरकुरीत आणि आतून चविष्ट लागते. विशेष म्हणजे ही कचोरी बटाट्याची भाजी, हिरवी चटणी किंवा गोड-तिखट चटणीसोबत सर्व्ह करता येते. चला तर मग, घरच्या घरी ही स्वादिष्ट स्टफ्ड बेसन कचोरी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

साहित्य :

कचोरीच्या आवरणासाठी

  • २ कप मैदा

  • अर्धा टीस्पून ओवा

  • चवीनुसार मीठ

  • १ टेबलस्पून तूप

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • तळण्यासाठी तेल

बेसनाच्या सारणासाठी

  • १ कप बेसन

  • अर्धा टीस्पून बडीशेप

  • अर्धा टीस्पून जिरे

  • चिमूटभर हिंग

  • चिमूटभर हळद

  • पाव टीस्पून कुटलेली लाल मिरची

  • १ टीस्पून धणेपूड

  • १ टीस्पून लोणच्याचा मसाला

  • १ कांदा, बारीक चिरलेला

  • १ हिरवी मिरची, बारीक चिरलेली

  • चवीनुसार मीठ

  • १ टेबलस्पून कोथिंबीर

कृती :

१. कचोरीचे पीठ मळून घ्या - एका परातीत मैदा घ्या. त्यात ओवा, मीठ आणि तूप घाला. सर्व साहित्य हाताने चांगले एकत्र करा. त्यानंतर थोडेथोडे पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. पीठ झाकून काही मिनिटे बाजूला ठेवा.

२. बेसनाचे सारण तयार करा - कढईत थोडे तेल गरम करा. त्यात हिंग, जिरे आणि बडीशेप घाला. फोडणी तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून काही सेकंद परता.

३. मसाले घालून बेसन भाजा - आता त्यात बेसन घाला आणि साधारण २ मिनिटे मंद आचेवर सतत ढवळत भाजून घ्या. त्यानंतर लाल मिरची, धणेपूड, हळद आणि लोणच्याचा मसाला घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून आणखी २ मिनिटे परता.

४. सारणाला अंतिम टच द्या - गॅस बंद करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. मिश्रण एकत्र करून थोडे थंड होऊ द्या.

५. कचोरीमध्ये सारण भरा - तयार पिठाचे समान आकाराचे गोळे करून घ्या. एक गोळा घेऊन थोडा लाटून त्याच्या मध्यभागी बेसनाचे सारण भरा. पिठाच्या कडा एकत्र करून सारण पूर्णपणे बंद करा आणि पुन्हा गोळा तयार करा.

६. कचोरी लाटून घ्या - सारण भरलेला गोळा हलक्या हाताने पुन्हा लाटून पुरीच्या आकाराचा करा. लाटताना जास्त जोर देऊ नका, अन्यथा सारण बाहेर येऊ शकते.

७. मंद-मध्यम आचेवर तळा - कढईत तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यावर गॅस मंद-मध्यम आचेवर ठेवा आणि कचोरी अलगद तेलात सोडा.

८. कुरकुरीत होईपर्यंत तळा - कचोरी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार कचोरी अतिरिक्त तेल निथळून बाहेर काढा. गरमागरम कचोरी बटाट्याची भाजी, हिरवी चटणी किंवा गोड-तिखट चटणीसोबत सर्व्ह करा.

खमंग कचोरीसाठी खास टिप्स :

  • कचोरीचे पीठ मळताना तूप नीट मळून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कचोरी खुसखुशीत होते.

  • बेसनाचे सारण मंद आचेवर व्यवस्थित भाजा; कच्च्या बेसनाचा वास राहणार नाही.

  • सारण पूर्णपणे थंड झाल्यावर कचोरीमध्ये भरा.

  • कचोरी लाटताना जास्त दाब देऊ नका, त्यामुळे सारण बाहेर येऊ शकते.

  • तेल खूप गरम असेल तर कचोरी बाहेरून लगेच लाल होईल पण आतून व्यवस्थित शिजणार नाही.

  • मंद-मध्यम आचेवर हळूहळू तळल्यास कचोरी अधिक कुरकुरीत आणि खुसखुशीत होते.

  • तयार कचोरी तळल्यानंतर लगेच बंद डब्यात ठेवू नका; वाफेमुळे तिचा कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग