दिवाळी म्हणजे फक्त प्रकाश आणि गोड पदार्थांचा सण नाही, तर नव्या सुरुवातीसाठी घर स्वच्छ करण्याची सुवर्णसंधी देखील आहे. स्वच्छतेशिवाय कोणताही सणाचा आनंद अपूर्ण राहतो. म्हणूनच सणापूर्वी किचन, कपाट, टेबल आणि घरातील प्रत्येक कोपरा नीट साफ केला जातो. मात्र, किचनमधील तेलकट आणि चिकट डाग स्वच्छ करणे हे सर्वांनाच कठीण काम वाटते. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुमची ही समस्या अगदी चुटकीसरशी सुटेल.
गॅस स्टोव्ह, चिमणी, स्लॅब किंवा टाइल्स स्वच्छ करण्यासाठी समान प्रमाणात पांढरी साखर आणि बेकिंग सोडा मिसळा. स्पंज किंवा ब्रश त्यात भिजवून चिकट पृष्ठभागावर हलक्या हाताने रगडा. १०–१५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने पुसून टाका. या मिश्रणामुळे तेलकट थर आणि धूळ सहज निघते.
ओव्हन किंवा जिद्दी डाग साफ करण्यासाठी दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात काही थेंब हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळा. हलके स्क्रब तयार होईल. हा स्क्रब जिद्दी डागावर लावून हलक्या हाताने रगडा. काही वेळ ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून काढा. डाग सहज निघून जातील आणि पृष्ठभाग नैसर्गिक चमकदार दिसेल.
कटिंग बोर्ड, सिंक किंवा नळासारख्या धातूच्या पृष्ठभागावर चिकट घाण असेल, तर लिंबावर थोडे मीठ पसरवा आणि त्याने रगडा. लिंबातील सायट्रिक आम्ल आणि मिठाच्या घर्षणामुळे घाण सहज निघून जाईल आणि पृष्ठभाग चमकदार होईल.
चिमणी किंवा कपाटावर जाड तेलकट थर असल्यास, त्यावर मैदा किंवा कॉर्न स्टार्च पसरवा. काही मिनिटांनी कोरड्या कापडाने पुसून टाका. नंतर थोडे साखर-व्हिनेगर त्यावर फवारून पुन्हा स्वच्छ करा. यामुळे तेलकट थर सहज जातात.
स्लॅबवर जुनी घाण असल्यास, एक बादली गरम पाण्यात डिश वॉशिंग लिक्विड मिसळा. मायक्रोफायबर कापड भिजवून त्याने गॅस, कपाट आणि स्लॅब स्वच्छ पुसून घ्या. गरम पाणी चिकट थर सैल करते, तर डिश लिक्विड घाण सहज साफ करते.