Diwali Lighting Tips : दिवाळीत घराचं लाइटिंग करा बिनधास्त! या एका स्मार्ट गॅझेटमुळे वाचेल विजेचा खर्च 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Diwali Lighting Tips : दिवाळीत घराचं लाइटिंग करा बिनधास्त! या एका स्मार्ट गॅझेटमुळे वाचेल विजेचा खर्च

दिवाळीत घराला भरपूर लाइटिंग करायचंय, पण वीजबिल वाढण्याची भीती वाटतेय? स्मार्ट आणि काही सोप्या टिप्स वापरून विजेचा खर्च कसा कमी करता येईल ते जाणून घ्या.

Mayuri Gawade

दिवाळी म्हटलं की घराची सजावट आणि रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई आलीच. घराचा दरवाजा, बाल्कनी, खिडक्या अशा प्रत्येक ठिकाणी दिव्यांची आकर्षक सजावट केली जाते. मात्र, हे दिवे अनेक तास सुरू राहिल्याने विजेचा वापर वाढू शकतो. त्यामुळे सणानंतर येणारे वीजबिलही वाढण्याची शक्यता असते. पण काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घराची रोषणाईही करता येईल आणि विजेचा वापरही मर्यादित ठेवता येईल. यासाठी एक स्मार्ट गॅझेटही उपयोगी पडू शकते.

१. जुन्या दिव्यांऐवजी LED दिवे निवडा

दिवाळीच्या सजावटीसाठी पारंपरिक जास्त वीज वापरणाऱ्या बल्बऐवजी LED दिव्यांचा वापर करा. LED दिवे तुलनेने कमी वीज वापरतात. उदाहरणार्थ, २५ वॅटच्या पारंपरिक बल्बऐवजी ५ वॅटचा LED बल्ब वापरल्यास प्रत्येक तासाला २० वॅट विजेची बचत होऊ शकते. शिवाय LED दिवे कमी उष्णता निर्माण करतात आणि जास्त काळ टिकतात.

२. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावण्याची गरज नाही

घर आकर्षक दिसण्यासाठी सगळीकडे रोषणाई करण्याची आवश्यकता नाही. मुख्य दरवाजा, बाल्कनी, खिडकी किंवा देवघर अशा काही ठरावीक जागा निवडा. तिथे व्यवस्थित दिव्यांची मांडणी केल्यास कमी दिव्यांमध्येही घर सुंदर दिसू शकते. यामुळे अनावश्यक वीज वापर टाळता येईल.

३. स्मार्ट प्लग किंवा टाइमर सॉकेट वापरा

दिवे बंद करायचे विसरता का? मग स्मार्ट प्लग किंवा टाइमर सॉकेट तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. या उपकरणाच्या मदतीने दिवे किती वाजता सुरू आणि किती वाजता बंद व्हावेत, याची वेळ आधीच सेट करता येते. उदाहरणार्थ, संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत रोषणाई सुरू ठेवण्यासाठी टाइमर लावता येतो. ठरलेल्या वेळेनंतर दिवे आपोआप बंद होतात. त्यामुळे वारंवार स्विच तपासण्याची गरज राहत नाही.

४. झोपण्यापूर्वी दिवे बंद करण्याची सवय लावा

अनेकदा दिवाळीच्या उत्साहात घराबाहेरील सजावटीचे दिवे रात्रभर सुरू राहतात. मात्र, घरात कोणी नसताना किंवा सर्वजण झोपल्यानंतर हे दिवे सुरू ठेवण्याची गरज नसते. झोपण्यापूर्वी आणि घराबाहेर जाताना सजावटीचे दिवे बंद करा. यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी होण्यास मदत होईल.

रोषणाई करताना सुरक्षिततेकडेही लक्ष द्या

वीज वाचवण्यासोबतच सजावटीच्या दिव्यांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. खराब किंवा कट पडलेल्या तारांचा वापर करू नका. एका प्लगमध्ये खूप उपकरणे जोडणे टाळा. दिव्यांची जोडणी व्यवस्थित आहे ना, हे तपासा. त्यामुळे शॉर्ट सर्किटसारखे अपघात टाळण्यास मदत होईल.

दिवाळीची सजावट करताना या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास घराचा आनंददायी लुक टिकवता येईल आणि विजेचा अनावश्यक वापरही कमी करता येईल. विशेषतः स्मार्ट प्लग किंवा टाइमर सॉकेटमुळे दिवे वेळेवर बंद करण्याची चिंता कमी होऊ शकते.

टीप : वीजबचतीचे प्रमाण वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा प्रकार, संख्या आणि ते किती वेळ सुरू आहेत यावर अवलंबून असते. स्मार्ट प्लग वापरण्यापूर्वी त्याची क्षमता आणि दिव्यांचा वीजभार तपासावा.

Delhi : रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा एल्गार; महारॅलीत विरोधकांचे शक्तिप्रदर्शन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

Thane : हरित फटाकेच विकता येणार; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके फोडण्यावर निर्बंध

Thane : दिवाळीतील पाणीकपात रद्द; २ आणि ९ नोव्हेंबरचा शटडाऊन स्थगित

पुणे मेट्रोच्या 'पिंक लाइन'चे ४ नोव्हेंबरला उद्घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार उद्घाटन

Bhayandar : बाळासाहेब ठाकरे कलादालन दिवाळीत खुले करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश