मुंबई : गणेश चतुर्थी अगदी उद्यावर आल्याने घराघरात बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. मूर्तीची निवड, सजावट, मखर आणि नैवेद्याची तयारी होत असतानाच गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी नेमकं काय-काय साहित्य लागणार? पूजा कधी करायची आणि कोणत्या क्रमाने विधी करायचा? याचीही तयारी करून ठेवणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या क्षणी पूजेच्या वस्तू शोधण्याची धावपळ टाळण्यासाठी आधीच सगळी सामग्री एकत्र ठेवली तर पूजा शांतपणे करता येते.
गणपती स्थापनेचा मुहूर्त
यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. पंचांगानुसार चतुर्थी तिथी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी सुरू होत असून, गणपती स्थापनेसाठी मध्यान्हकाळातील सकाळी ११ ते दुपारी १.४० हा वेळ महत्त्वाचा मानला जातो.
याच दिवशी हरितालिका तृतीया व्रतही असल्याने दोन्ही पूजा एकाच वेळी न करता एक पूजा पूर्ण केल्यानंतर दुसरी पूजा करावी, अशी पद्धत सांगितली जाते.
प्राणप्रतिष्ठेसाठी आधीच काय साहित्य तयार ठेवावं?
पूजेचं मुख्य साहित्य : हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, अष्टगंध, अक्षता, फुले, हार, पत्री, दूर्वा, पंचामृत, फळं आणि नारळ.
नैवेद्य व प्रसाद : मोदक, पेढे, साखरफुटाणे, गूळ-खोबरे, खडीसाखर किंवा आवडीनुसार सुकामेवा.
पूजेची भांडी : कलश, तांब्या, पेला, पळी, ताम्हण, पंचपात्री, समई, निरांजन आणि धूप-दीपासाठी लागणारं साहित्य.
इतर वस्तू : विड्याची पानं, सुपारी, सुटी नाणी, जानवं, कापसाचं वस्त्र आणि आसन.
पूजेपूर्वी मांडणी कशी करावी?
मखरात पाट ठेवून त्यावर तांदूळ पसरावेत आणि त्याच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती ठेवावी. मूर्तीच्या एका बाजूला कलशाची स्थापना करावी. त्यात पाणी, सुपारी, नाणं, हळद आणि दूर्वा ठेवून वर आंब्याची पानं आणि नारळ ठेवता येतो.
समई, निरांजन, धूप आणि उदबत्ती आधीच तयार ठेवावेत. हळद-कुंकू, अष्टगंध, शेंदूर, अक्षता आणि इतर पूजा साहित्य वेगवेगळ्या वाट्यांमध्ये काढून ठेवलं तर पूजा करताना सोय होते. फुले, पत्री, दूर्वा, विड्याची पानं, फळं आणि नैवेद्यही जवळ ठेवावेत.
प्राणप्रतिष्ठेची सुरुवात कशी करावी?
सर्वप्रथम आचमन, प्राणायाम आणि देवतांचं स्मरण करून पूजेचा संकल्प करावा. त्यानंतर कलश, घंटा आणि दीप यांचं पूजन करावं.
यानंतर गणपतीच्या मूर्तीचं नेत्रोन्मीलन आणि प्राणप्रतिष्ठा केली जाते. मूर्तीवर मनोभावे अक्षता अर्पण करून गणरायाला या मूर्तीत विराजमान होण्याचं आवाहन केलं जातं.
गणपतीला स्नान, वस्त्र आणि अलंकार
मूर्ती मातीची असल्याने तिच्यावर थेट पाणी ओतण्याऐवजी दुर्वा किंवा फुलाने पाण्याचं हलकं प्रोक्षण करता येतं. पंचामृताचाही प्रतीकात्मक स्पर्श केला जातो. त्यानंतर वस्त्र, जानवं, अष्टगंध, शेंदूर आणि अक्षता अर्पण कराव्यात. फुले, पत्री आणि दूर्वाही वाहाव्यात.
गणपतीला २१ दूर्वांच्या जुड्या अर्पण करण्याची परंपरा आहे. यावेळी ‘ॐ गं गणपतये नमः’ असा जप करता येतो.
नैवेद्य, आरती आणि मंत्रपुष्पांजली
पूजेनंतर मोदक, पेढे, खीर किंवा गूळ-खोबरे यांसारखा नैवेद्य बाप्पाला दाखवावा. त्यानंतर तांबूल, सुपारी, दक्षिणा आणि फळं अर्पण करता येतात.
शेवटी कुटुंबातील सर्वांनी मिळून गणपतीची आरती करावी. कापूरारतीनंतर फुले आणि अक्षता अर्पण करून मंत्रपुष्पांजली करावी. गणरायाची प्रार्थना करून क्षमायाचना करावी आणि शेवटी साष्टांग नमस्कार करून प्रसाद वाटावा.
पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा
प्राणप्रतिष्ठा आणि पूजाविधीमध्ये घरच्या परंपरेनुसार किंवा पुरोहितांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार बदल असू शकतात. त्यामुळे वरील माहिती ही सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी आहे. शक्य असल्यास आपल्या कुटुंबाच्या प्रथा आणि स्थानिक पुरोहितांच्या मार्गदर्शनाला प्राधान्य द्यावं.