लाईफस्टाईल

सोशल मीडियावरील आगंतुक दोस्ती ठरतेय जीवघेणी; वर्षाला दोन लाख पीडित ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात

सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला मोहात पाडून तिला आपल्या जाळ्यात अडकवल्यावर ब्लॅकमेल करण्याचे ‘हनी ट्रॅप’चे प्रकार प्रचंड वाढले असून देशभरात वर्षभराच्या कालावधीत दोन लाखांहून अधिक गुन्हे नोंदवले जात आहेत.

Swapnil S

मुंबई : सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला मोहात पाडून तिला आपल्या जाळ्यात अडकवल्यावर ब्लॅकमेल करण्याचे ‘हनी ट्रॅप’चे प्रकार प्रचंड वाढले असून देशभरात वर्षभराच्या कालावधीत दोन लाखांहून अधिक गुन्हे नोंदवले जात आहेत. मात्र, अब्रू वाचवण्यासाठी तक्रार दाखल करण्याचे टाळले जात असल्याने प्रत्यक्षात घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण यापेक्षा कैक पटीत आहे.

सन २०२३ मध्ये संयुक्त राष्ट्र मानवी हक्क विभागाने ‘हनी ट्रॅप’बाबत केलेल्या एका अहवालात संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी दक्षिण-पूर्व एशियामध्ये हजारो लोकांना या जाळ्यात अडकवून केवळ एका वर्षात ६४ हजार कोटी रुपये उकळल्याचे नमूद केले होते.

आता प्रत्यक्ष न भेटता केवळ मोबाईल आणि कॉम्पुटरवरून सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे हा ट्रॅप रचला जातो आणि खंडणीही ऑनलाइन उकळली जाते. एका मॉडेलने रचलेल्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या ३२ वर्षीय सीए राज मोरे याने पावणेतीन कोटी रुपये गमावल्यानंतर आत्महत्या करण्याची खळबळजनक घटना नुकतीच मुंबईत घडली. अशाप्रकारे देशभर अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.

मुंबईतून कर्नाटकला हवालाची तीन कोटींची रक्कम पोहोचवण्यासाठी निघालेल्या गाडीच्या चालकाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून दरोडा घालण्याचा प्रकार कराड येथे घडल्यानंतर त्यात महिलेसह दहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. यावरून हा प्रकार कसा संघटितपणे चालतो हे उघड झाले.

सोशल मीडियाच्या जमान्यात आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर उपलब्ध असते. त्यामुळे कुणाशीही संपर्क साधण्याचे काम अतिशय सोपे झाले आहे. याचाच गैरफायदा घेत महिलांचे डीपी झळकवत ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवत जवळीक साधली जाते. त्याला प्रतिसाद दिल्यास काही दिवसांनंतर त्याचे प्रतिकूल परिणाम पाहावयास मिळतात. आरोपींकडून प्रेमसंबंध निर्माण करून त्याचे पुरावे तयार केले जातात आणि मग सुरू होतो ब्लॅकमेलचा खेळ.

त्यासाठी गुन्हेगार टोळ्या आधीच महिलांना पीडित व्यक्तीशी बातचीत करावयास लावत अश्लील चाळे करावयास भाग पडतात. त्याचे रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावरील त्याच्या निकटवर्तीयांना पाठवण्याच्या धमक्या दिल्या जातात. फेसबुकसारख्या सोशल मीडियावर ती व्यक्ती कुणाकुणाची मित्र आहे ते त्यांनी आधीच हेरलेले असते. पीडित व्यक्तीने केवळ बातचीत केली तरी त्याचे व्हिडिओ करून मॉर्फिंगद्वारे त्याची अश्लील दृश्ये तयार केली जातात. समाजात नाचक्की होण्याच्या भीतीपोटी समोरची व्यक्ती मागेल ती रक्कम देण्यास पीडित व्यक्तीला देण्यास मजबूर होतात.

जगात ‘हनी ट्रॅप’ या शब्दाचा वापर कादंबरीकार जॉन ली कैरी याने १९७४ साली त्याच्या कादंबरीत केला होता. त्यानंतर गुप्तचर संस्थांनी त्या शब्दाचा वापर त्यांच्या सापळ्यांसंदर्भात करावयास सुरवात केली आणि आता तर तो शब्द सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचलित झाला आहे.

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवणारे आरोपी पीडितांची कमजोर बाजू हेरतात. त्याला किती सहजपणे हाताळता येते याचा ते अंदाज घेतात. ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे, त्यांना बळी बनवले जाते.

काय कराल?

  • सोशल मीडिया अकाऊंट सुरक्षित ठेवा : आपले पासवर्ड मजबूत ठेवा.

  • अनोळखी व्यक्तींपासून दूर राहा : सोशल मीडियावरील रिक्वेस्टना काळजीपूर्वक प्रतिसाद द्या.

  • फुटप्रिंट तपासा : डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या व्यक्तीचे प्रोफाईल तपासून घ्या.

काय टाळाल?

  • निमंत्रण टाळा : ओळख होताच भेटण्याचे निमंत्रण दिल्यास सावध व्हा.

  • व्हिडीओ कॉलवर संभाषण नकोच : समोरील अनोळखी व्यक्तीने व्हिडीओ कॉल केलाच तर तो अजिबात अटेंड करू नका.

  • खंडणी देऊ नका : खंडणीची मागणी झाल्यास त्वरित पोलिसांत तक्रार करा.

  • गोपनीय माहिती देऊ नका : समोरील व्यक्तीला वैयक्तिक अथवा व्यावसायिक माहिती शेअर करू नका.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत